जागतिक व्यंगचित्रकार दिन (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
पुणे/प्रगती करंबेळकर: एकेकाळी वृत्तपत्रांचे अविभाज्य अंग असलेली व्यंगचित्रे आज सोशल मिडियाच्या माध्यमातून नव्या स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर व्यंगचित्रकार विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर चोखंदळ भाष्य करत आपली कला अधिक व्यापक रूपात सादर करत आहेत.
आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. हा दिवस १८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड’ प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात स्वतंत्र्यपूर्वकाळात वृत्तपत्रांसोबतच व्यंगचित्रेही समाजावर प्रभाव पाडण्याचे माध्यम होऊ लागले. यानंतर आर. के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रास एक नवीन ओळख निर्माण करून दिली.
व्यंगचित्रांमध्ये, व्यंगचित्रकार एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा चेहरा, भाव, पात्र, पोशाख, कथानक आणि संवाद याद्वारे व्यंग किंवा विनोदाचा समावेश करतो. चाणाक्षपणा, उपजत विनोदबुध्दी, परिस्थितीचे अवलोकन करुन व्यंगचित्र काढले जाते. म्हणूनच व्यंगचित्रकारास सगळ्याचे ज्ञान असणे गरजेचे असते. कारण व्यंगचित्राद्वारे विविध विषयांवर बोलले जाते. शासकीय, राजकीय, ऐतिहासिक, कौटुंबिक अशा विषयांवर हास्य रसाचा वापर करून चित्र काढले जाते.
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तंत्रज्ञानाचा व्यंगचित्रकार वापर कशा पद्धतीने करतात याबद्दल भाष्य केले त्यांच्या म्हणण्यानुसार वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रांची तरी कमी होत असले तरी तंत्रज्ञानातील झालेली प्रगती आणि त्यामुळे सोशल मीडिया सारखे माध्यम याचा वापर व्यंगचित्रकार करतात. व्यंगचित्राचे विषय वादग्रस्त असल्याने वृत्तपत्रात असे विषय टाळले जातात. परंतु मीडियावर कोणतेही बंधन नसल्याने व्यंगचित्रकार या माध्यमाचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वापर करतात. आम्ही गेल्या ४ वर्षांपासून व्यंगचित्र दिनानिम्मित व्यंगचित्राचे प्रदर्शन आयोजित करतो. व्यंगचित्राचा प्रसार व्हावा आणि व्यंगचित्रास जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा, तरुण पिढीमध्ये या कलेबद्दल अनुरूची निर्माण व्हावी. यासाठी दरवर्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येते.”
” राजकीय विषय वादग्रस्त असतात परंतु त्या विषयाला निखळ विनोदा मध्ये परिवर्तीत करून व्यंगचित्र काढणे आवश्यक असते. वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्र कमी झाली आहेत याचे कारण सध्या विनोद हा हास्यासाठी नाही तर वादासाठी वापरला जातो आणि म्हणूनच सोशल मीडियाकडे व्यंगचित्रकार वळत आहेत.”
– विनय चाणेकर (व्यंगचित्रकार)
सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना एक जागतिक स्तर मिळाला आहे. ज्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात त्यांची कला पोहचवू शकतात. शिवाय सोशल मीडिया समुदायांमुळे इतर व्यंगचित्रकारांशी संपर्क साधून या क्षेत्रास चालना मिळते. प्रदर्शनाची माहिती सहज कलाकारांपर्यँत पोहचवली जाते ज्यामुळे व्यंगचित्रकारांना संधी मिळते.