Victims of Terrorism Day : 'दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच' २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Day of Remembrance and Tribute to Victims of Terrorism : २१ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण जगभरात “दहशतवादाच्या बळींच्या स्मरण आणि श्रद्धांजलीचा आंतरराष्ट्रीय दिन” पाळला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस दहशतवादाने प्रभावित झालेल्या लोकांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी समर्पित केला आहे. या दिवशी पीडितांच्या आठवणींना उजाळा देत, जगभरात करुणा, लवचिकता आणि मानवतेच्या मूल्यांचा संदेश दिला जातो.
भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी फक्त १० दहशतवाद्यांनी मुंबईवर रक्तरंजित हल्ला केला. या भीषण कारवाईत १६६ निरपराध नागरिकांचा जीव गेला आणि शेकडो लोक गंभीर जखमी झाले. ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, नरीमन हाऊस अशा प्रमुख ठिकाणांवर दहशतवादी थैमान घालून बसले होते. तीन दिवसांनी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा पूर्णपणे खात्मा केला.
या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा होती. त्यांच्या या कटाला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि अल-कायदा यांचंही पाठबळ असल्याचं नंतर उघड झालं. दहा दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत पकडला गेलेला अजमल कसाब भारतात न्यायालयीन प्रक्रियेनंतर फाशी दिला गेला. कसाबने कबुली दिली की तो पाकिस्तानातील प्रशिक्षण छावण्यांतून तयार झाला होता आणि हल्ल्याचं संपूर्ण नियोजन लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलं होतं.
हे देखील वाचा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
मुंबई हल्ल्याच्या कटात अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडली आणि कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा यांचाही सहभाग सिद्ध झाला आहे. त्यांनी अमेरिकन न्यायालयात कबुल केलं की हा कट लष्कर-ए-तैयबाच्या नेतृत्वाखाली आणि आयएसआयच्या थेट पाठबळावर रचला गेला होता.
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली दहशतवादाला कोणताही धर्म, कायदा किंवा मानवी मूल्यं मान्य नाहीत. त्यांच्या रणनीती फक्त भीती पसरवण्यावर आधारित असतात. निरपराध नागरिक, मुले, महिला किंवा वृद्ध कोणालाही ते वाचवत नाहीत. बॉम्बस्फोट, गोळीबार, अपहरण, अशा विविध मार्गांनी ते समाजात दहशत निर्माण करतात.
आजही लष्कर-ए-तैयबा पाकिस्तानात उघडपणे सक्रिय आहे. २०१० मध्ये त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठा हल्ला करण्याचा कट रचला होता; मात्र गुप्तचर यंत्रणेमुळे तो उधळून लावण्यात आला. नंतर भारतीय सुरक्षा संस्थांनी सौदी अरेबियातून दहशतवादी अबू जिंदाल याला पकडले, जो भारताविरुद्ध आणखी एका हल्ल्याचा कट आखत होता.
हे देखील वाचा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
२१ ऑगस्टचा हा स्मरणदिन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की दहशतवाद हा फक्त राष्ट्रांचा नाही तर मानवतेचा शत्रू आहे. २६/११ सारख्या घटना कधीही विसरता येणार नाहीत. त्या प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात की जागरूकता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कठोर कारवाई याशिवाय हा धोका थांबणार नाही.