World Bee Day 2025: मधमाश्यांचे संवर्धन ही काळाची गरज, जाणून घ्या 'जागतिक मधमाशी दिना'चे महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Bee Day : दरवर्षी 20 मे रोजी जगभरात ‘जागतिक मधमाशी दिन’ (World Bee Day) साजरा केला जातो. मधमाश्यांचे जैविक, पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) २०१७ मध्ये या दिवसाची औपचारिक घोषणा केली, आणि २०१८ पासून तो अधिकृतपणे साजरा होऊ लागला.
जागतिक मधमाशी दिनाची निवड अँटोन जानसा यांच्या जन्मदिनी करण्यात आली आहे. ते आधुनिक मधमाशी पालनाचे जनक मानले जातात. १७३४ मध्ये जन्मलेल्या जानसा यांनी मधमाश्यांच्या सवयी, स्वभाव व पालन तंत्राचा अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांच्या कार्यामुळेच आज मधमाशी पालन अधिक शास्त्रीय व उत्पादनक्षम बनले आहे.
मधमाश्या, फुलपाखरे, वटवाघुळे आणि हमिंगबर्ड्स हे परागीकरणासाठी अत्यावश्यक जीव आहेत. विशेषतः मधमाश्या हे पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचे परागीकरण करणारे जीव आहेत. त्यांच्यामुळेच फळे, भाज्या, धान्ये आणि अनेक औषधी वनस्पतींचे उत्पादन शक्य होते. जागतिक अन्न सुरक्षेमध्ये मधमाश्यांचे योगदान अमूल्य आहे.
परागीकरणामुळेच जैवविविधता टिकवून ठेवता येते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि शेतीचे उत्पादनही वाढते. याशिवाय, मधमाश्यांनी तयार केलेले मध आरोग्यासाठी उपयुक्त असते आणि त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : “एकही युद्ध जिंकले नाही… तरीही छाती पदकांनी भरली!” पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीकेचा भडीमार
आजच्या यांत्रिक आणि रसायनप्रधान शेतीच्या युगात मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
1. रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी वापर मधमाश्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करत आहे.
2.जंगलतोड आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.
3.हवामान बदल, सतत तापमानात होणारी चढ-उतार यांचा मधमाश्यांच्या जीवनचक्रावर थेट परिणाम होतो.
4.याशिवाय, रोग व कीटकांचे हल्ले, आणि परकीय प्रजातींचा फैलाव यामुळेही मधमाश्यांची संख्या घटत आहे.
जागतिक मधमाशी दिन हा केवळ एक औपचारिक साजरा नसून मधमाश्यांच्या संरक्षणासाठी कृती करण्याची गरज अधोरेखित करणारा दिवस आहे.
1. शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले जाते.
2. लोकांनी फुलांची लागवड करून मधमाश्यांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करावी.
3.स्थानिक मध उत्पादकांना पाठिंबा देणे, आणि त्यांची उत्पादने खरेदी करणे यामुळे मधमाशी पालनास प्रोत्साहन मिळते.
4.शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्था यांना मधमाशींच्या महत्त्वाबाबत जनजागृतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकीकडे लष्करप्रमुखांना धमकावत होते युनूस, तर दुसरीकडे बांगलादेशच्या सैन्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मधमाश्यांशिवाय शेती, अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेचा विचारही करता येणार नाही. त्यामुळे मधमाश्यांचे रक्षण करणे म्हणजे आपले भवितव्य सुरक्षित करणे होय. जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ही जबाबदारी ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी कृतीशील होणे ही काळाची गरज आहे.