मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्वातील किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आज त्याचा ३४ वा वाढदिवस (Birthday) साजरा करीत आहे. दिल्ली येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कोहलीने त्याच्या क्रिकेट मधील कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांचा मनोरा रचला आहे. कारकिर्दीत आलेल्या अपयशांवर कोहलीने आपल्या मेहेनतीच्या जोरावर मात करत आजही तो क्रिकेटच्या मैदानात तुफान खेळी करत भारताची मान अभिमानाने उंचावत आहे. यंदा ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी २० विश्वचषकातही तो भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करीत असून विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीतही विराट कोहली अव्वल स्थानी पोहचला आहे. क्रिकेट जगतातील एक रत्न असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीवर एक नजर टाकुयात…

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचं वडील प्रेम कोहली हे फौजदारी वकील होते. विराट कोहली हा दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये लहानाचा मोठा झाला असून त्याने त्याचे शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. विराट कोहलीने पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
केवळ २३ इनिंगमध्ये १ हजार धावांचा टप्पा :

टी-२० विश्वचषकातील सुपर १२ फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचला आहे. विराट कोहली त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पाचवा टी-२० विश्वचषक खेळत आहेत. टी-२० विश्वचषकातील अवघ्या २३ इनिंगमध्ये त्यानं १ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी टी-२० विश्वचषकात महेला जयवर्धनेनं ३१ डावात १ हजार १६ धावा केल्या होत्या. मात्र विराट कोहलीने हा विक्रम मोडीत काढला. या दरम्यान, विराटच्या बॅटमधून १२ अर्धशतकं झळकली आहेत. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक दोन वेळा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा खिताब जिंकणारा विराट एकमेव खेळाडू आहे.
विराट कोहलीची कारकिर्द :

विराट कोहलीने आतापर्यंत १०२ कसोटी, २६२ एकदिवसीय आणि ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहलीनं टी-२० सामन्यांमध्ये ३ हजार ९३२ धावा केल्या आहेत, तो लवकरच या फॉरमॅटमध्ये ४ हजार धावा पूर्ण करणार आहे. २०१९ पासून फॉर्मच्या शोधात असलेल्या विराट कोहलीनं प्रथम आशिया चषक आणि त्यानंतर टी २० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यानं आशिया चषक स्पर्धेत त्यानं टी २० फॉरमेटमधील पहिलं शतक झळकावलं होतं.






