वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सध्या बोर्डाने भारतीय संघात मयंक अग्रवालच्या नावाचा समावेश केला आहे. त्यांच्याशिवाय आणखी काही नावांची लवकरच घोषणा होऊ शकते. भारतीय क्रिकेट संघातील ८ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४ खेळाडूंची नावे नुकतीच समोर आली आहेत. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे आहेत. सध्या संपूर्ण टीम आयसोलेशनमध्ये आहे.
सध्या टीम इंडिया अहमदाबादमध्ये आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हा सामना 6 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी भारतीय संघात कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. धुमल यांनी एएनआयला सांगितले की, काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत, बीसीसीआय या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.
सर्व सामने ६ ते २० फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे ६ फेब्रुवारी, दुसरा ९ फेब्रुवारी आणि तिसरा ११ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर उभय संघांमधला पहिला T20 १६ फेब्रुवारी, दुसरा १८ फेब्रुवारी आणि तिसरा सामना २० फेब्रुवारीला होणार आहे. हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवले जातील.
२ खेळाडू स्टँडबाय म्हणून तयार
बीसीसीआयने सध्या तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू शाहरुख खान आणि लेग-स्पिनर साई किशोर यांना वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्टँडबाय म्हणून ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने स्टँडबाय म्हणून या दोघांच्या नावांची घोषणा केली होती. सध्या हे दोन्ही खेळाडू मुख्य संघाचा भाग नाहीत, पण आता त्यांना संघाचा भाग बनवता येईल.
कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली मालिका
विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका असेल. २०२३ मध्ये, भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे.