आज बहुचर्चित आशिया कपचे (Asia Cup) बिगुल वाजणार असून यात आशियातील सहा संघ एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात भिडताना पहायला मिळणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान (Pakistan) आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारतासोबत (India) पहिली मॅच खेळणार असून याकडे सध्या सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र असे असतानाच या हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
शाहीन आफ्रिदीनंतर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर (Mohammad Wasim Junior) देखील आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर (mohammad wasim jr) डाव्या बाजूच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. बुधवारी पाकिस्तानच्या सराव सत्रात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली.
२८ ऑगस्ट रोजी भारताविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरला झालेली दुखापत ही पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाही.यापूर्चवी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद वसीम ज्युनियरच्या जागी हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र याला इव्हेंट टेक्निकल कमिटीची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.
वेगवान गोलंदाज वसीमने गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हापासून तो ११ टी२० सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने १५. ८८ च्या सरासरीने आणि ८. १० च्या इकॉनॉमीने १७ बळी घेतले आहेत. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेतही वसीमने चमकदार कामगिरी केली होती. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ विकेट घेतल्या.
आशिया कपमधून बाहेर होणारा पाकिस्तानचा हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. याआधी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला संघात स्थान मिळाले आहे.