जो रूट(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs ZIM : झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून जिथे दोन्ही संघांमध्ये चार दिवसांचा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने आपला आक्रमक फॉर्म दाखवून दिला आहे. ब्रिटिशांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी ४९८ धावांचा डोंगर उभा केला आहे. इतकेच नाही तर जो रूटने या सामन्यात फक्त ३४ धावा करून मोठा इतिहास रचला आहे. या सोबतच त्याने भारतीय महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले आहे.
इंग्लंड संघाचा धोकादायक फलंदाज जो रूट एकामागून एक विक्रम खालसा करत आहे. तो कसोटी सामन्यांमध्ये दबदबा राखून आहे. दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध ३४ धावा केल्यानंतर तो माघारी परतला, परंतु त्याने भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना ओव्हरटेक केले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रूटने ४४ चेंडूत ३४ धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याला माघारी परतावे लागले होते. जरी त्याने छोटेखानी खेळी केली सळी तरी या दरम्यान त्याने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३,००० धावा पूर्ण केल्या आहेत. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १३,००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १५३ डाव खेळेल आहेत.
जो रूटने आता दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज जॅक कॅलिस, भारताचा राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग यांना मागे सोडले आहे. जॅक कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये १५९ सामने खेळून १३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय राहुल द्रविडने १६०, रिकी पॉन्टिंगने १६२ तर सचिन तेंडुलकरने १६३ सामने खेळले आहेत.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच दिवशी इंग्लिश फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडने तीन विकेटच्या मोबदल्यात ४९८ धावा उभारल्या. जिथे ३ फलंदाजांनी शतके झळकावली. ज्यामध्ये जॅक क्रॉलीने १२४ धावा, बेन डकेटने १४० धावा आणि ऑली पोपने १६९ धावा कुटल्या. तर, जो रूट ३४ धावा करून माघारी परतला.
२० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यापैकी पहिली कसोटी 20-24 जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.