फोटो सौजन्य : England Cricket
इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याचा अहवाल : इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये टी-20 मालिका सुरु आहे. या तीन सामन्याच्या मालिकेचा तिसरा सामना काल पार पडला. या सामन्यामध्ये इंग्लडच्या संघाने वेस्ट इंडीजला पराभुत करुन मालिकेमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून इंग्लंडने मालिका ३-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेनंतर वेस्ट इंडिजला टी२० मालिकेतही क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. तिसऱ्या टी२० सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांचा चांगलाच पराभव झाला. या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणुन घ्या.
इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून एकूण २९ षटकार मारले. त्यापैकी १५ षटकार इंग्लंडने तर १४ षटकार वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी मारले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ३ गडी गमावून २४८ धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन डकेटने ४६ चेंडूत सर्वाधिक ८४ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान डकेटने १० चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय जेमी स्मिथने २६ चेंडूत जलद ६० धावा केल्या, ज्यामध्ये ५ षटकारांचा समावेश होता. कर्णधार हॅरी ब्रूकने नाबाद ३५ आणि जेकब बेथेलने नाबाद ३६ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ २११ धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना, रोवमन पॉवेलने ४५ चेंडूत सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान रोवमन पॉवेलने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय, कर्णधार शाई होपने २७ चेंडूत ४५ धावा केल्या, ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४५९ धावा केल्या.
A record-breaking total! 💥
33 boundaries in our 248 🏏
Another win secured 💪
Full match highlights 👇— England Cricket (@englandcricket) June 10, 2025
या सामन्यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स सर्वात महागडा ठरला. त्याने ४ षटकांत ६३ धावा दिल्या आणि फक्त १ बळी मिळवला. याशिवाय, वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू होता ज्याने ४ षटकांत ६० धावा दिल्या आणि त्याला एकही बळी मिळाला नाही.