भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक (Subhash Bhowmick) यांचे शनिवारी निधन झाले. कोलकाता येथे वयाच्या 71 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून मधुमेह आणि किडनीशी संबंधित आजारानं त्रस्त होते. मात्र, आज अखेर पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
सुभाष भौमिक यांनी मोहन बागान, पूर्व बंगाल आणि भारताच्या राष्ट्रीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी भारतासाठी 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्यांनी 9 गोल केले. 1971 च्या मर्डेका चषकात त्यांनी फिलिपाइन्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. या सामन्यात भारताने 5-1 असा विजय मिळवला होता. त्यांनी 1970 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती. भौमिक यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1950 रोजी झाला. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. 30 जुलै 1970 रोजी मर्डेका कपमध्ये फॉर्मोसाविरुद्ध पहिला सामना खेळले. सुभाष भौमिक हे स्ट्रायकर म्हणून भारतीय फुलबॉल संघाचा भाग होते. यासोबतच 1971 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पेस्ता सुकान चषक स्पर्धेत दक्षिण व्हिएतनामसोबत संयुक्तपणे जिंकलेल्या भारतीय संघाचाही ते सदस्य होते. 1970 च्या मर्डेका चषकातही त्यांना कांस्यपदक मिळालं होतं. 1971 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचाही ते सदस्य होते. एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खूप यश मिळवले. एआयएफएफने (AIFF) शनिवारी अधिकृतपणे भौमिक यांच्या who helped indiaनिधनाच्या बातमीची पुष्टी केली आणि सुभाष यांना श्रद्धांजलीही वाहिली.