भारताचे लक्ष्य २०३६ चे ऑलिंपिक स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
हॉकी इंडिया लीगमुळे वाढतोय सामन्यांचा अनुभव
प्रतिभा शोध, चाचणी, ६.२० लाखांची शिष्यवृत्ती
१० एनसीओई केंद्रे आणि निवडक खेळाडूंना वार्षिक ६.२० लाखांची शिष्यवृत्ती
असित मंडल/पुणे: भारतात २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि ऐतिहासिक पदकांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि हॉकी इंडियाने तळागाळापासून व्यापक तयारी सुरू केली आहे. ग्रासरूट स्तरापासून वरिष्ठ राष्ट्रीय संघापर्यंत प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी भक्कम आणि वैज्ञानिक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे.
पुण्यात सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान प्रतिभा शोध मोहिमेसाठी आलेले भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान हाय परफॉर्मन्स डायरेक्टर पीयूष दुबे यांनी दैनिक नवभारतचे प्रतिनिधी असित मंडल यांच्याशी खास बातचीत करत भारताला पुन्हा हॉकीतील जागतिक महासत्ता बनविण्याच्या या महत्त्वाकांक्षी आराखड्याची सविस्तर माहिती दिली.
तळागाळापासून एलिट स्तरापर्यंत भक्कम व्यवस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला पदक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या पीयूष दुबे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०३६ ऑलिम्पिक व्हिजनच्या पार्श्वभूमीवर ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सुमारे ३६ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीद्वारे क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या विकासावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. देशभरात १० राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे अर्थात एनसीओई, भारतीय क्रीडा प्राधिकरणाची प्रशिक्षण केंद्रे आणि सुमारे १०० खेलो इंडिया केंद्रे कार्यरत आहेत.
Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम
प्रतिभा शोध, चाचणी, ६.२० लाखांची शिष्यवृत्ती
पीयूष दुबे यांनी स्पष्ट केले की, निवडीसाठी कोणतीही निश्चित संख्या ठेवण्यात आलेली नाही. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आणि गुणवत्ता दिसेल, त्याला संधी दिली जाईल. अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंना खेलो इंडिया अंतर्गत दरवर्षी ६.२० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये १.२० लाख रुपये थेट आर्थिक स्वरूपात, तर ५ लाख रुपयांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, निवास आणि क्रीडा उपकरणे यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय अनुभवातून घडत आहेत नवे स्टार
प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी मागील ३ ते ४ वर्षांपासून त्यांना नेदरलँड्ससारख्या हॉकीतील आघाडीच्या देशांमध्ये प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक दौऱ्यांसाठी पाठविण्यात येत आहे. या व्यवस्थेचा परिणाम आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत असल्याचे दुबे यांनी सांगितले.वरिष्ठ विश्वचषकात खेळलेल्या भारतीय महिला संघातील १२ आणि पुरुष संघातील ७ खेळाडू खेलो इंडिया आणि एनसीओई व्यवस्थेतून पुढे आले आहेत. तसेच आगामी कनिष्ठ आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या १८ सदस्यीय संपूर्ण संघातील खेळाडूही याच प्रशिक्षण केंद्रांमधून घडले आहेत. हरियाणाची साक्षी राणा, ओडिशाची सुनेलिता टोप्पो, मिझोरमची लालथ्वांगी यांसारख्या खेळाडूंनी या व्यवस्थेतून प्रगती केली आहे.
Hockey World Cup मध्ये Team India चा नेदरलँड्सकडून दारुण पराभव, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…
हॉकी इंडिया लीगमुळे वाढतोय सामन्यांचा अनुभव
युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना अधिकाधिक सामन्यांचा अनुभव मिळावा यासाठी पुनरुज्जीवित हॉकी इंडिया लीग आणि वर्षभर विविध स्तरांवर होणाऱ्या अस्मिता लीग महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या स्पर्धांमुळे खेळाडूंचा सामन्यातील संयम, दबावाखाली खेळण्याची क्षमता आणि ‘मॅच टेम्परामेंट’ विकसित होत असल्याचे दुबे यांनी सांगितले.महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि दक्षिण भारतातील चारही राज्यांमध्ये हॉकीची मजबूत परंपरा आहे. महाराष्ट्राचा आदित्य लालगे राष्ट्रीय संघात खेळत असून, ही समृद्ध परंपरा पुढे नेण्याचे काम युवा पिढी करत आहे.






