तिसऱ्या T20I पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 3rd T20I match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील २ सामने खेळून झाले असून. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४ विकेट्सने पराभूत केले होते. या मालिकेतील तिसरा सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी करत दुसरा सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. आता, मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारतीय संघाला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. दोन्ही संघांचे लक्ष या सामन्यावर असणार आहे, परंतु त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड तिसऱ्या T20I साठी संघात समाविष्ट असणार नाही. त्याला या दौऱ्यातील फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठीच संघात स्थान दिले होते. जोश हेझलवुड आता आगामी अॅशेस मालिकेसाठी तयारी करणार आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी दुसऱ्या सामन्यात शानदार स्पेल टाकून भारतीय फलंदाजीची दाणादाण उडवली होती.
मेलबर्नमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात जोश हेझलवूडने नवीन चेंडूने चांगलाच हल्ला चढवला. भारताने प्रथम फलंदाजी केली, परंतु ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय संघाला चांगलेच अडचणीत आणले. हेझलवूडने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १३ धावा देऊन तीन विकेट घेतल्या, ज्याचा इकॉनॉमी रेट फक्त ३.२० होता. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा सारखे प्रमुख फलंदाज त्याच्या अचूक लाईन आणि लेंथचा सामना करण्यास अपयशी ठरले. या प्रभावी कामगिरीसाठी हेझलवूडची सामनावीर म्हणून देखील निवड करण्यात आली.
दुसऱ्या टी-२० मध्ये भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे कमजोर दिसून आली. केवळ अभिषेक शर्मा हा एकमेव फलंदाज वगळता इतर फलंदाजांना मैदानावर टिकाव धरण्यात यश आले नाही. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ५६ धावांची आक्रमक खेळी केली. कर्णधार शुभमन गिल फक्त ५ धावा काढून माघारी गेला, तर संजू सॅमसनने २, सूर्यकुमार यादवने १ धावा केल्या आणि तिलक वर्मा धाव न घेताच बाद झाला.
हेही वाचा : IND W vs SA W: अंतिम सामना मोफत पाहायचा? असा करा जुगाड; कधी, कुठे आणि कसा? वाचा सविस्तर
तिसऱ्या सामन्यात, भारताला आता त्यांची फलंदाजीच सुधारावी लागणार नाही तर त्यांच्या गोलंदाजीत देखील अधिक सुधाराणा कारवाई लागणार आहे. संघाला लवकर विकेट घ्याव्या लागतील आणि डेथ ओव्हर्समध्ये धावा थांबवाव्या लागतील. दरम्यान, ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यावर जास्त लक्ष केंद्रित करेल. यावेळी हेझलवूडची अनुपस्थिती भारतासाठी दिलासा देणारी असणार आहे.






