फोटो सौजन्य - X
भारतीय महिला अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या दोन मालिकांमध्ये कमालीची कामगिरी करत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका जिंकली आहे. पण या मालिकेचा आज शेवटचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने एलिसा हिलीच्या शतकाच्या जोरावर भारत अ संघाचा ९ विकेट्सने पराभव केला.
एकदिवसीय महिला विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असताना या मालिकेचे आयोजन केले होते. भारताच्या संघासाठी पुढील विश्वचषक फार महत्त्वाचा असणार आहे कारण या विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका येथे करण्यात आले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने शेफाली वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान संघासमोर २१७ धावांचे लक्ष्य ठेवले, जे कांगारूंनी फक्त २७.५ षटकांत पूर्ण केले. एलिसा हिलीने ८४ चेंडूत १३७ धावांची शानदार खेळी केली ज्यामध्ये २३ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या शानदार खेळीसाठी तिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली. शेफाली वर्मा आणि नंदिनी कश्यप यांनी पहिल्या विकेटसाठी १८.१ षटकांत ८१ धावा जोडल्या. शेफालीने ५२ धावा आणि नंदिनीने २८ धावा केल्या. मात्र, या जोडीच्या ब्रेकनंतर भारतीय खेळाडू स्कोअरबोर्डवर जास्त धावा टाकू शकले नाहीत. यास्तिका भाटिया (४२) ने निश्चितच चांगली खेळी केली, परंतु तिला इतर कोणाकडूनही साथ मिळाली नाही.
इतक्या चांगल्या सुरुवातीनंतरही, भारताला पूर्ण ५० षटके फलंदाजी करता आली नाही आणि संपूर्ण संघ ४७.४ षटकांत २१६ धावांवर ऑलआउट झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलिया अ संघाने वादळी सुरुवात केली. ताहलिया विल्सन (५९) आणि एलिसा हिली यांनी १६.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी १३७ धावा जोडल्या. ताहलियाला राधा यादवने बाद केले. त्यानंतरही हिलीची फलंदाजी थांबली नाही आणि तिने १३३ चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने अजिंक्य आघाडी घेतली होती, त्यामुळे तिसरा सामना गमावल्यानंतरही त्यांनी मालिका २-१ अशी जिंकली.