फोटो सौजन्य - सोशल मिडिया/ आयसीसी
भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या संघाला लीग सामन्यामध्ये पराभुत केले होते त्यामुळे आता भारताच्या संघाला बदला घेण्याची संधी आहे. पण त्याआधी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर प्रतिका रावल हिच्या जागी शेफाली वर्माची निवड जाहीर करण्यात आली आहे. जखमी प्रतिकाच्या जागी शेफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे. फॉर्ममध्ये असलेली प्रतीका घोट्याच्या दुखापतीमुळे २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात तिचा उजवा घोटा मुरगळला होता. गुरुवारी (३० ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शेफाली स्मृती मानधनासोबत डावाची सुरुवात करू शकते. तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या २१ वर्षीय शेफालीने जुलै २०२४ मध्ये तिचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तिने भारतासाठी २९ एकदिवसीय, पाच कसोटी आणि ९० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. “बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना उजव्या घोट्याला दुखापत झालेल्या प्रतीका रावलच्या जागी शेफाली वर्माला संघात बोलावण्यात आले आहे,” असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.
श्रेयस अय्यरला मोठी दुखापत; अय्यरचे ‘हे’ ठरवता त्याला भारताचा स्टार खेळाडू; एकदा वाचाच
२१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रतिकाने चेंडू रोखण्यासाठी डीप मिडविकेटवरून धाव घेतली तेव्हा तिचा उजवा पाय ओल्या मैदानात अडकला आणि ती वेदनेने कोसळली. भारतीय खेळाडू प्रतीकाच्या बाजूला धावले आणि मैदानावर स्ट्रेचर आणण्यात आले, परंतु २५ वर्षीय खेळाडू सपोर्ट स्टाफच्या मदतीने मैदानाबाहेर गेली. प्रतिका संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तिने सहा डावांमध्ये ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत. प्रतिकाने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये पहिले शतक झळकावले. यादरम्यान, ती महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारी संयुक्त खेळाडूही ठरली. प्रतिकाने वरच्या क्रमांकावर स्मृती मानधनासोबत चांगल्या भागीदारी केल्या.
आक्रमक फलंदाज शेफालीला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. २१ वर्षीय सलामीवीरचा सरासरी एकदिवसीय विक्रम आहे, तिने २९ सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने ६४४ धावा केल्या. सातत्याच्या अभावामुळे शेफालीला एकदिवसीय संघात स्थान मिळवता आले नाही. तथापि, तिने लहान फॉरमॅटमध्ये तिचे स्थान कायम ठेवले आहे. रिचा घोषच्या तंदुरुस्तीबद्दलही शंका आहे. यष्टीरक्षक-फलंदाजाला न्यूझीलंडविरुद्ध बोटाला दुखापत झाली आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून तिला बाहेर काढण्यात आले.






