भारताने पाकिस्तावर ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर नेदरलँड्सचा ९५ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २०९ धावा केल्या आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला ११४ धावांवर सर्वबाद केले. सलामीवीर स्मृती मंधानाने ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची शानदार खेळी केली.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. पाकिस्तानविरुद्ध संघाने १६.५ षटकांत १२७ धावांचे लक्ष्य गाठले आणि २ विकेट्सने विजय मिळवला. अष्टपैलू खेळाडू अँरी डर्कसनने ३५ चेंडूंमध्ये ५२ धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. जर ती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरली, तर हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० वा टी२० सामना असेल. यासह, हरमनप्रीत पुरुष आणि महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २०० सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू बनेल. आतापर्यंत कोणत्याही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूने हा पराक्रम केलेला नाही. पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक १६३ सामने खेळले आहेत, तर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू म्हणून हरमनप्रीत आधीच ओळखली जाते.
मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. परंतु, वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९० ते २०० धावांच्या दरम्यान असते, त्यामुळे एक मोठा धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे.
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.
दक्षिण आफ्रिका: एल. वोल्वार्ड (कर्णधार), सुने लुस, ॲन्री डेर्कसेन, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, कायला रेनेके, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.






