फोटो सौजन्य - BCCI
T-२० विश्वचषक २०२४ : T-२० विश्वचषक २०२४ चे (T-20 World Cup 2024) दोन्ही सेमीफायनलचे सामने पार पडले आहेत. आता चाहते वाट पाहत आहेत ते म्हणजेच T-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्याची. T-२० विश्वचषक २०२४ ची विषाविजेता कोण होणार याकडे चाहत्यांच्या नजरा टिकून आहेत. सेमीफायनल १ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Afghanistan vs South Africa) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघात लढत पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाला १०३ धावांवर सर्वबाद करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या सामन्यामध्ये भारताचे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी दमदार कामगिरी करून इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. पहिल्या सहा ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलला कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीसाठी बोलावले आणि त्याने विकेट्स घ्यायला सुरुवात केली. अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध ४ षटक टाकली, यामध्ये त्याने २३ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर पॉवरप्ले संपताच रोहितने कुलदीप यादवला गोलंदाजी देऊन त्याने त्याची जादू दाखवली. त्याने ४ षटक टाकत फक्त १९ धावा दिल्या आणि ३ विकेट्स मिळवले.
यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सुद्धा मोलाची कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २.४ षटक टाकली आणि १२ धावा देत २ विकेट्स घेऊन भारताच्या संघाला विजय मिळवून दिला.
भारताचा सामना २८ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना भारतासाठी नक्कीच कठीण असणार आहे कारण दोन्ही संघ या सामन्यामध्ये अजुनपर्यत अपराजित राहिले आहेत. दोन्ही संघानी या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाही त्यामुळे या दोन्ही संघांमधील लढत नक्कीच रोमांचक असणार आहे. या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.