(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांना नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी चाहत्यांची नेहमीच गर्दी होताना दिसत असते. मात्र यावेळी हास्यजत्रेच्या शिलेदारांनाच खास ‘फॅन मोमेंट’ अनुभवण्याची संधी मिळाली आहे. कारण सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा याला भेटण्याचा योग ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातील कलाकारांना मिळाली आहे. काही क्षणांची ही भेट कलाकारांसाठी आयुष्यभराची आठवण ठरली आहे.
हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर यांच्यासह अभिनेत्री भक्ती देसाई आणि भाग्यश्री मिलिंद यांनी रोहित शर्माची भेट घेतली. ही खास भेट मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय देसाई, किशोर लाड आणि वर्षा हडकर यांच्या पुढाकाराने पार पडली. या भेटीदरम्यान रोहितने सर्वांशी मराठीत संवाद साधत सर्वांना सुखद धक्का दिला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून चाहते खुश झाले आहेत. आणि चाहते व्हिडीओवर कंमेंट करून भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. भक्ती देसाई आणि नम्रता संभेराव यांनी हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. रोहितला भेटण्याआधीची उत्सुकता आणि तो समोर येताच बदललेला आनंदी हा कॅमेऱ्यात अत्यंत उत्तम टिपला गेला आहे. अमराठी असूनही रोहितने सहजपणे मराठीत संवाद साधल्याने कलाकारांसह चाहत्यांनाही अभिमानाची भावना निर्माण झाली.
व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत
संवादादरम्यान नम्रता रोहितला म्हणाली, ओ माय गॉड… कसे आहात तुम्ही? रोहित म्हणाला, ‘मज्जेत’ नम्रता पुन्हा म्हणाली, ‘आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून.. मराठीत बोलते, कारण तुम्ही मराठीत बोलतानाचे व्हिडिओ मी पाहिलेत सोशल मीडियावर’ असं म्हणाल्यानंतर रोहित पुन्हा म्हणाला, “हो… मी मुंबईत राहतो, त्यामुळे मराठी येणारच.” त्याच्या या साध्या आणि मनमोकळ्या उत्तराने उपस्थित सर्वजण भारावून गेले. भेटीनंतर कलाकारांनी त्याच्यासोबत फोटोही काढले.
सोशल मीडियावर या व्हिडिओंना तुफान प्रतिसाद मिळत असून लाखो व्ह्यूज आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. रोहित शर्मा आणि हास्यजत्रेच्या कलाकारांच्या या अनोख्या भेटीने चाहत्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. तसेच रोहितचा हा मराठी अंदाज देखील चाहत्यांना आवडला आहे.






