येत्या गुरुवारपासून यजमान टीम इंडिया टी-२० मालिका विजयाच्या मोहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी घरच्या मैदानावर उतरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा टी-२० सामना दिल्लीत रंगणार आहे. या मालिकेत यजमान टीम इंडियाकडून ईशान किशनला संधी देण्यात आली. तो पहिल्यांदाच आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. याशिवाय आयपीएल चॅम्पियन गुजरात टीमचा कर्णधार हार्दिक आणि दिनेश कार्तिकही या मालिकेसाठी भारतीय संघात आहेत.
ईशान किशनला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आक्रमक फलंदाजीची संधी आहे. तो पहिल्यांदाच आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये १२०.११च्या स्ट्राइक रेटने ४१८ धावा काढल्या. आता तो याच फॉरमॅटच्या मालिकेतही झंझावाती खेळी करू शकणार आहे.
अष्टपैलू खेळीच्या बळावर हार्दिकने आता क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन केले असून तो फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरात टीमने पदार्पणात आयपीएलचा किताबावर मोहोर उमटवली. आता त्याला आफ्रिकेविरुद्ध मालिकेतही दमदार खेळीची संधी आहे. यापूर्वी त्याने आफ्रिकेविरुद्ध मालिकेत सामन्यागणिक बळी घेतले होते. आताही त्याच्याकडून या कामगिरीची संघाला मोठी आशा आहे.
संघासाठी मॅच विनरची खेळी करण्यात दिनेश कार्तिक हा सक्षम मानला जातो. त्याला तीन वर्षांनंतर टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये बंगळुरू संघासाठी फिनिशरची सर्वोत्तम भूमिका यशस्वीपणे बजावली होती.