ईशान किशनचा दोन वर्षांचा संघर्ष अखेर संपला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कसोटी मालिकेच्या अगदी आधी, अनुशासनहीनतेच्या कारणावरून इशान किशनला भारतीय संघातून वगळण्यात आले. त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी, इशान तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग होता आणि २०२३ च्या वर्ल्ड कपमध्येही खेळला होता. चांगला फॉर्म असूनही इशानला वगळण्यात आले. त्यानंतर लवकरच, इशानला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही वगळण्यात आले होते.
एकतर्फी मॅच फिरविण्याची हिंमत, तरीही संघात झाली नाही निवड; 5 दुर्दैवी खेळाडू T20 World Cup मुकले
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व
टीम इंडियामधून वगळल्यानंतर आणि त्याचा केंद्रीय करार गमावल्यानंतर, इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आणि गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे, चांगली कामगिरी करत आहे. अलीकडेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिष्ठित टी-२० स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आयोजित केली. या स्पर्धेत इशानने झारखंडचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली, किशनने झारखंडला पहिल्याच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नेले. झारखंडने अंतिम सामन्यात हरियाणाला ६९ धावांनी हरवले.
ईशानची मॅचविनिंग खेळी
अंतिम सामन्यात ४९ चेंडूत १०१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळण्यासोबतच, इशान किशनने स्पर्धेतील १० डावांमध्ये ५१७ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतके होती. इशान स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले.
किशनचा समावेश आश्चर्यकारक आहे. कदाचित त्यालाही संघात स्थान मिळण्याची अपेक्षा नव्हती. जितेश शर्माला वगळून किशनचा संघात समावेश करण्यात आला. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळणाऱ्या इशानने ३२ टी२० सामन्यांच्या ३२ डावांमध्ये ७९६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सहा अर्धशतके आहेत.
ईशान किशनला दुखापतींनीदेखील ग्रासले
इंग्लंड दौऱ्यादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्याच्या जागी इशान किशनला संघात समाविष्ट करण्याची चर्चा होती. दरम्यान, इशानला दुखापत झाल्याची बातमी समोर आली. त्याला ही दुखापत सामना खेळल्यामुळे नाही तर स्कूटरवरून पडल्याने झाली. त्याच्या डाव्या पायाला १० टाके पडले होते. एकंदरीतच ईशानची गेली २ वर्ष अत्यंत खडतर होती आणि तरीही त्याने हार न मानता मेहनत केली आणि अखेरीस त्याचे नशीब उजळले आहे आणि मेहनतीनंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.






