फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी सज्ज झाला आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या होम वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा १८ जानेवारी करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर उपकर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयने ज्या संघाची घोषणा केली आहे यामध्ये विकेटकिपर संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांची नावे नाहीत.
सध्या भारतामध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु आहेत, यामध्ये करुण नायरने कमालीची कामगिरी केली आहे पण त्याच्या संघाच्या हाती निराशा लागली. मात्र, सर्वात जास्त चर्चा करुणची आहे, ज्याची किमान एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड होणे अपेक्षित होते. भारताचा फलंदाज करुण नायर याला टीम इंडियामध्ये बऱ्याच वेळापासून वगळण्यात आले आहे. त्याची देशांतर्गत सातत्याने केलेल्या कामगिरीवर कोणाचेही लक्ष नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.
३३ वर्षीय करुण नायर स्वत: पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करेल असा आत्मविश्वास होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील आता खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते. या आधारे भारतीय संघातही खेळाडूंची निवड केली जाईल. म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर तुम्ही धावा केल्या तर तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल. मात्र, करुणच्या बाबतीत असे दिसून आले नाही.
एखाद्या खेळाडूने देशांतर्गत स्पर्धेत सरासरी ३९० च्या आसपास धावा केल्या, तरीही त्याची निवड झाली नाही, तर प्रश्न उपस्थित होतात. अशा परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट खेळून काय फायदा? टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही बऱ्याचदा टीम इंडियाच्या निर्णयावर त्याचे मत सोशल मीडियावर मांडत असतो. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याचे विचार मांडले आहेत. करुण नायरकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हरभजनने निवड समितीवर निशाणा साधला. हरभजनने X वर लिहिले, ‘डोमेस्टिक क्रिकेट खेळण्यात काही फायदा आहे का? जेव्हा तुम्ही खेळाडूंची निवड त्यांच्या फॉर्म आणि कामगिरीच्या आधारावर करत नाही.
टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनाही पत्रकार परिषदेत करुण नायरबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आगरकर म्हणाले की, करुण नायरचा सध्याच्या संघात समावेश करणे कठीण आहे. करुण नायरची चर्चा झाल्याचे आगरकरने मान्य केले असले तरी सध्या तरी त्याला संघात स्थान मिळालेले नाही. आगरकरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल विदर्भाच्या कर्णधाराचे कौतुक केले. तो खरोखरच खास कामगिरी करतोय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याची सरासरी अपवादात्मक होती.