SA vs AUS (Photo Credit- X)
SA vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका (SA vs AUS) पुर्णपणे बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे. आजपासून दोन्ही संघामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका खेळवली जात आहे. नुकताच, पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ९८ धावांनी दारूण पराभव (SA Beat AUS) केला. २९७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, संपूर्ण कांगारू संघ फक्त १९८ धावांवर गारद झाला. केशव महाराज (Keshav Maharaj) यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर कांगारु फलंदाज टीकू नाही शकले आणि त्यांने अवघ्या ३३ धावा देऊन ५ बळी मिळवले. धावांच्या फरकाने दक्षिण आफ्रिकेचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकदिवसीय सामना ९८ धावांनी जिंकून इतिहास रचला आहे. हा दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियन भूमीवरील एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेने १९९४ मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना ८२ धावांनी जिंकला होता. आता दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय सामना मोठ्या फरकाने जिंकून चमत्कार केला आहे.
Dominant South Africa go 1-0 up in the three-match ODI series 👏#AUSvSA 📝: https://t.co/QDaIezC4wg pic.twitter.com/ycGVwhqk7h
— ICC (@ICC) August 19, 2025
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात जबरदस्त झाली. एडन मार्करम आणि कर्णधार टेंबा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मार्करमने ८१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ८२ धावांची दमदार खेळी केली. बावुमानेही ७४ चेंडूंमध्ये ६५ धावांचे योगदान दिले. तसेच, मॅथ्यू ब्रीट्जकेने ५६ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या, तर वियान मुल्डरने शेवटच्या षटकांमध्ये २६ चेंडूंमध्ये ३१ धावांची जलद खेळी करत संघाला ५० षटकांत ८ बाद २९६ धावांपर्यंत पोहोचवले.
२९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. पण त्यानंतर केशव महाराजने हेडला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नस लाबुशेन (१) आणि कॅमेरॉन ग्रीन (३) स्वस्तात बाद झाले. मग तर जणू कांगारू फलंदाजांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतण्याची स्पर्धाच लागली होती. जोश इंग्लिस ५ धावांवर, तर ॲलेक्स कॅरी शून्यावर बाद झाले. एकट्या मिचेल मार्शने एक बाजू सांभाळत ८८ धावांची शानदार खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १९८ धावांवर गारद झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला फिरकी गोलंदाज केशव महाराज. त्याने आपल्या १० षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ३३ धावा देत ५ महत्त्वाचे बळी घेतले. त्याची भेदक गोलंदाजी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी धोकादाय बनली. त्याला नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन चांगली साथ दिली. आता मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके येथे खेळवला जाईल. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तर ते मालिका आपल्या नावावर करतील. पण जर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला, तर ते मालिकेत बरोबरी साधतील.