जपान ओपन २०२२ ही बॅडमिंटन स्पर्धा (Badminton Championship) सध्या सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने (Kidambi Srikanth) जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ली जी जियाचा पराभव केलाय. श्रीकांतनं ३७ मिनिटं चाललेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित ली विरुद्ध२२-२०, २३-२१ असा विजय मिळवला. परंतु राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनला (Lakshya Sen) बुधवारी जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तसेच लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालच्या (Saina Nehwal) पदरातही निराशा पडली असून तिचा अकाने यामागुचीने ९-२१, १७-२१ असा पराभव केला.
एमआर अर्जुन- ध्रुव कपिला पुरुष जोडीचा पराभव :
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जगातील २६व्या क्रमांकावर पोहोचलेल्या एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरी जोडीला कोरियाच्या चोई सोल ग्यु आणि किम वॉन यांच्याविरुद्ध २१-१९, २१-२३, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागलाय.
गायत्री गोपीचंद- ट्रिसा जॉलीच्या पदरात निराशा :
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली या महिला दुहेरीच्या जोडीला सातव्या मानांकित थायलंडच्या जोंगकोल्फान कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगजाई यांच्याकडून १७-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला.
मिश्र दुहेरीत भारताची निराशाजनक कामगिरी :
मिश्र दुहेरीत जुही देवांगन आणि वेंकट गौरव प्रसाद या जोडीला अव्वल मानांकित झेंग सी वेई आणि चीनच्या हुआंग या कियांग यांच्याकडून अवघ्या २३ मिनिटांत ११-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.