रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला. तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत १४३ धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १६ व्या षटकात पूर्ण केले. मुंबईने जबरदस्त पुनरागमन करून आयपीएल २०२५ मधील सलग चार सामने जिंकले आहेत. तसेच लागोपाठ सामन्यात अर्धशतक झळकावून रोहित शर्माने आपल्या संघाला विजयी रुळावार आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या सामन्यात रोहितने ७० धावांची खेळी केली.
हैद्राबादने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. यादरम्यान, त्याने ४६ चेंडूंचा सामना करताना १५२ च्या स्ट्राइक रेटने ७० धावा केल्या. रायन रिकल्टन लवकर बाद झाल्यानंतर रोहितने सर्व सूत्र आपल्या हाती घेऊन मुंबईचा डाव सांभाळला. यासह, त्याने आयपीएलमध्ये एक विक्रम देखील केला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘किंग’ कोहलीचा जलवा कायम! खुणावतोय IPL मधील ‘विराट’ पराक्रम; मोडणार ‘हा’ विक्रम..
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ७० धावांची खेळी खेळून रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजारांहून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत रोहित शर्माच्या आधी विराट कोहलीचा नंबर लागतो. विराट कोहलीने ४०७ टी-२० सामन्यांमध्ये १३,२०८ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, रोहित शर्माने ४५६ टी-२० सामन्यांमध्ये १२,०५८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने या हंगामात सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे मुंबईचे विजय देखील सहज शक्य झाले. गुणतालिकेत मुंबईने मोठी झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे.
त्यासोबतच मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ बळी मिळवले. त्याने सनरायझर्स हैदराबादच्या पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला माघारी पाठवले. त्यानंतर, बोल्टने अभिनव मनोहर, पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांची शिकार केली. याशिवाय, दीपक चहरला या सामन्यात दोन बळी टिपण्यास यश मिळाले.
हेही वाचा : MI vs SRH : Rohit Sharma चा मुंबई इंडियन्ससाठी ‘बिग शो’, रचला मोठा इतिहास; किरॉन पोलार्डलाही पछाडले..
दीपक चहरने इशान किशनला १ धावांवर तर नितीश कुमार रेड्डीला २ धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय जसप्रीत बुमराहने वेगवान फलंदाजी करणाऱ्या हेनरिक क्लासेनला माघारी पाठवले. तर त्याच वेळी कर्णधार हार्दिक पंड्याने देखील एक गडी बाद केला.