नॅट सायव्हर-ब्रंटचा WPL मध्ये विक्रम(फोटो-सोशल मीडिया)
Nat Sciver-Brunt sets a record in WPL : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये, काल मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सला जरी पराभव पत्करावा लागला तरी या संघाची स्टार खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटने स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकावून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांमध्ये ती अव्वल स्थानावर पोहोचली आहे. सायव्हर-ब्रंटने तिच्या १० व्या अर्धशतकासह, सायव्हर-ब्रंटने हरमनप्रीत कौर आणि मेग लॅनिंगची बरोबरी साधली आहे.
१५ जानेवारीला डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सविरुद्ध, सायव्हर-ब्रंटने ४३ चेंडूत ६५ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ९ चौकारा लगावले. सायव्हर-ब्रंटने तिच्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची बरोबरी साधली आहे. या हंगामात आतापर्यंत सायव्हर-ब्रंटने तीन सामने खेळलेले आहेत आणि दोन अर्धशतके लगावली आहेत. या स्पर्धेत ब्रंटने ४, ७० आणि ६५ धावा केल्या आहेत.
आता अव्वल स्थानावर तीन फलंदाज विराजमान आहेत. सायव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर आणि मेग लॅनिंग १० अर्धशतकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. एलिस पेरी ८ अर्धशतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, तर अॅशले गार्डनर आणि शेफाली वर्मा प्रत्येकी ६ अर्धशतकांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.
टॉस गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने ५ गडी गमावत १६१ धावा केल्या होत्या. मुंबईकडून नॅट सायव्हर ब्रंटने ४३ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. तर निकोला केरीने नाबाद ३२ धावांची खेळी केली. विरोधी संघाकडून शिखा पांडे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन आणि आशा शोबाना यांनी प्रत्येकी १ गडी माघारी पाठवला.
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या यूपी वॉरियर्सने १८.१ षटकांत ७ विकेट्स शिल्लक असतानाच सामना आपल्या नावे केला. संघाकडून हरलीन देओलने ३९ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. यामध्ये तिने १२ चौकार मारले. संघासाठी कर्णधार मेग लॅनिंगने २५ तर फोबी लिचफिल्डने देखील २५ धावा केल्या. क्लो ट्रायॉननेही नाबाद २७ धावा करून संघाला ११ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला. मुंबईकडून सायव्हर-ब्रंटने २ बळी आणि अमेलिया केरने १ बळी घेतला.






