विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli has a chance to set a world record in the third ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना १८ जानेवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिका जिंकणार आहे. तसेच, या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी असणार आहे. विराट कोहलीने या मालिकेत आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९३ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. तथापि, दुसऱ्या सामन्यात मात्र तीला २३ धावाच करता आल्या होत्या, हा सामना मात्र भारताला गमवावा लागला होता.
विराट कोहलीने जर अंतिम सामन्यात शतक झळकवण्याची किमया साधली तर तो एकदिवसीय इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके (७) ठोकणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरेल. सध्या, न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम संयुक्तपणे भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या नावे जमा आहे. या दोघांनीही प्रत्येकी सहा शतके झळकवली आहेत. जर विराट कोहलीने आज सातवे शतक झळकावले तर तो या दोन महान खेळाडूंचे विक्रम मोडीत काढून या यादीत अव्वल स्थानी येईल.
वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंडविरुद्धच्या २३ सामन्यांपैकी २३ डावांमध्ये एकूण ११५७ धावा फटकावल्या आहेत. १३० धावा त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. या काळात त्याची सरासरी ५२.५९ आणि स्ट्राइक रेट १०३.९५ होता, ज्यामध्ये त्याने ६ शतके आणि ३ अर्धशतकं ठोकली आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंगने ५१ सामन्यांपैकी ५० डावांमध्ये १९७१ धावा काढल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १४१ राहिली आहे, तर त्याचा सरासरी ४५.८३ आणि स्ट्राइक रेट ८१.७१ होता. पॉन्टिंगने या दरम्यान, ६ शतके आणि १२ अर्धशतके लगावली आहेत.
इंदूरचे होळकर स्टेडियम नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. जिथे धावांचा पाऊस पडतो. त्यामुळे, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये हा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.






