एकेकाळी मास्टर ब्लास्टर सोबत क्रिकेटचे मैदान गाजवणारे माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambali) आर्थिक संकटात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत ही माहिती दिली असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात असल्याचे सांगितले होते. तेव्हा काहीच दिवसांनी अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात (Sandip Thorat)यांनी कांबळी यांना नोकरीची ऑफर दिली होती. ती नोकरी विनोद कांबळी यांनी स्वीकारली असून आता ते लवकरच कामाला सुरुवात करा असे म्हणत आहेत.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांना अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांनी दरमहा एक लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर विनोद कांबळी यांनी नुकतीच स्वीकारली याबाबत सह्याद्री मल्टिस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालकपदाची धूरा कांबळींवर सोपविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आपल्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत केलेलं वक्तव्य अहमदनगरचे उद्योजक संदीप थोरात यांच्या पाहण्यात आले. देशासाठी खेळलेल्या खेळाडूवर अशी परिस्थिती ओढवल्याने आपण त्यांना ही ऑफर दिल्याचे संदीप थोरात यांनी सांगितले होते. सोबतच क्रिकेट हा मॅनेजमेंटचा खेळ आहे आणि एखाद्या फायनान्स कंपनीत ही मॅनेजमेंट खूप महत्वाचे असते त्यामुळे कांबळी यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आमच्या कंपनीला फायदाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी मुंबईत जाऊन कांबळी यांची भेट घेतली आणि आपली ऑफर त्यांना सांगितली. विनोद कांबळी यांनीही ही ऑफर स्वीकारत संदीप थोरात यांचे आभार मानले. दरम्यान थोरात यांनी तात्काळ कांबळी यांना एक लाख रुपयांचा चेक प्रदान केला.
एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारे विनोद कांबळी आता सह्याद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीच्या मानद संचालक पदी दिसणार आहेत.त्यांच्यासाठी ही नवीन कारकीर्द असणार आहे.मुंबई येथील शाखेची जबाबदारी ते यापुढे सांभाळतील अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.