फोटो सौजन्य - San Francisco Unicorns
MLC 2025 First Match : सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध वाॅश्गिंटन फ्रिडम यांच्यामध्ये मेजर लिग क्रिकेट 2025 चा पहिला सामना पार पडला. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघाने 123 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर वाॅश्गिंटन फ्रिडम यांनी सामन्याचे नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचे कर्णधारपद हे कोरी अॅडरसन यांच्याकडे आहे तर मॅक्सवेल यांच्याकडे वाॅश्गिंटन फ्रिडम या संघाची कमान आहे.
आजपासुन या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यांसंदर्भात सविस्तर जाणुन घ्या. हा सामना जिंकून सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने सीझन-३ ची शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या फिन अॅलनचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला, ज्याने वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना चकित करून ऐतिहासिक खेळी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने २० षटकांत ५ गडी गमावून २६९ धावा केल्या. यादरम्यान फिन अॅलनने स्फोटक फलंदाजी करत फक्त ५१ चेंडूत १५१ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान अॅलनने १९ षटकार आणि ५ चौकार मारले. याशिवाय संजयने ३६ आणि हसन खानने नाबाद ३८ धावा केल्या. वॉशिंग्टन फ्रीडमकडून गोलंदाजी करताना जॅक एडवर्डने सर्वाधिक २ बळी घेतले.
The @SFOUnicorns take the W in the 2025 MLC season opener by a whopping 123 runs! 🔥 pic.twitter.com/5Q30DJeg8g
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 13, 2025
२७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमचा संपूर्ण संघ १३.१ षटकात १४६ धावांवरच बाद झाला. जलद धावा करण्याच्या प्रयत्नात संपूर्ण संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. वॉशिंग्टन फ्रीडमकडून फलंदाजी करताना रचिन रवींद्रने १७ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. याशिवाय मिशेल ओवेनने ३९ आणि जॅक एडवर्डने २१ धावा केल्या. त्याच वेळी वॉशिंग्टन फ्रीडमचे ७ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.