भारत आणि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. सुपर ४ सामन्यांचा थरार संपला असून आता सर्वांच्या नजरा लागून आहेत त्या आशिया कपच्या अंतिम सामन्यावर ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. रविवारी, २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्याआधीच भारताच्या कर्णधाराचे विधान व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानला आधीच दोन वेळ धूळ चारली आहे. भारतीय संघाने टीम ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला ७ विकेट्सने आणि सुपर-४ सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले आहे. आता, सूर्या आर्मी तिसऱ्या विजयाकडे आणि ट्रॉफीवर कब्जा करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यास सज्ज झाली आहे.
शुक्रवारी अआशिया कपमधील शेवटचा सुपर-४ सामना खेळला गेला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्स गमावून २०२ धावा केल्या होत्या, तर श्रीलंकेने प्रत्युत्तरात फक्त २०२ धावाच करता आल्या. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर पार पडली यामध्ये भारताने सुपर ओव्हर सामना जिंकला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. त्याने स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही अंतिम फेरीत देखील अशाच पद्धतीने उतरू, जसे आज उतरलो होतो.” श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अनेक खेळाडूंना क्रॅम्पचा त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे पुनरागमनावर आमचा जोर राहील. असेही त्याने यावेळी नमूद केले.
भारत आणि पाकिस्तानमधील सुपर ४ सामना चांगलाच वादग्रस्त ठरला. मैदानावर अनेक वेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या भारतीय खेळाडूंना चिथावण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर, हरिसने विमान पाडण्याचा इशारा देखील केला होता तर साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदूक चालवण्याचे सेलिब्रेशन केले होते.
आकडेवारी बघितली तर भारताची बाजू वरचढ दिसत आहे. पाकिस्तानची परिस्थिती आणखी वाईट दिसते. ऑक्टोबर २०२२ पासून पाकिस्तानने भारताला एकाही सामन्यात पराभूत केलेले नाही. भारतीय संघाने गेल्या सात सामन्यांमध्ये सलग विजय मिळवलेले आहेत. परिणामी, दुबईतील हा ऐतिहासिक अंतिम सामना पुन्हा एकदा भारताच्या बाजूनेच झुकताना दिसू लागला आहे.