टीम एक्स्ट्रीमने नॅशनल स्केटिंग स्पर्धेत मिळवले यश (फोटो- सोशल मीडिया)
पुण्यात पार पडली नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप
टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी केली 6 पदकांची कमाई
राज्यातील ६६८ खेळाडूंनी घेतला स्पर्धेत सहभाग
पुणे: पुणे येथे रूरल गेम्स ऑफ इंडिया (RGOI) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत नवी मुंबईच्या टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी (Sports) उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी तब्बल ६ पदकांची कमाई करत महाराष्ट्राच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
ही प्रतिष्ठेची राष्ट्रीय स्पर्धा १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील एलएक्सटी राहुल राणे स्केटिंग बँड ट्रॅकवर पार पडली. देशभरातील १२ राज्यांमधील ६६८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून ५ ते १६ वर्षे वयोगटातील खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
नवी मुंबईच्या टीम एक्स्ट्रीमकडून
अनन्या माळी – २ रौप्य पदके
स्वरूप सोनवणे – १ रौप्य व १ कांस्य पदक
पृथ्वी भावना राजेश – २ कांस्य पदके
अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवण्यात आली. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर या खेळाडूंनी महाराष्ट्रासाठी गौरवशाली यश संपादन केले.
या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षक करण सरदार यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले. स्वतः राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या करण सरदार यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील टीम एक्स्ट्रीम स्केटिंग क्लबमध्ये सध्या १०० हून अधिक खेळाडू नियमित प्रशिक्षण घेत आहेत. आधुनिक प्रशिक्षण पद्धती, तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता आणि मानसिक तयारी यावर विशेष भर दिला जात आहे.
रोलर स्पीड स्केटिंग हा वेग, अचूकता आणि सहनशक्ती यांचा कस पाहणारा खेळ असून २०० मीटर ट्रॅक, मास स्टार्ट रेस, वेलोड्रोमसदृश वळणदार भिंती आणि फोटो फिनिशसारख्या अटींमुळे स्पर्धेची तीव्रता अधिक वाढते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी दिलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदकांची कमाई करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या ३२२ खेळाडूंनी विविध गटांत पदके जिंकून राज्याला विजयी ट्रॉफी मिळवून दिली. उत्तर प्रदेशने दुसरा तर दिल्लीने तिसरा क्रमांक पटकावला.
भविष्यातही महाराष्ट्रासाठी अधिकाधिक पदके जिंकण्याचा निर्धार टीम एक्स्ट्रीमने यावेळी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात रोलर स्केटिंग या खेळाचा प्रसार वाढवून अधिकाधिक गुणवंत खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवण्याच्या दिशेने टीम एक्स्ट्रीम स्केटिंग क्लब सातत्याने कार्यरत आहे.






