बेन स्टोक आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील विजेत्या संघाच्या कर्णधाराला ‘पतौडी पदक’ देण्यात येणार आहे. ज्यामुळे या दोन्ही देशांमधील क्रिकेट स्पर्धेत या राजघराण्याचे नाव कायम राहील. पतौडी कुटुंबाचे दोन्ही देशांमधील क्रिकेटसोबत खूप गहिरे नाते आहे.
यापूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून पतौडी ट्रॉफीचे नाव बदलून तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान याची औपचारिक घोषणा करण्यात येणार होती. परंतु अहमदाबादमध्ये भीषण एअर इंडिया विमान अपघातामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यासह क्रिकेट जगतातील काही इतर दिग्गज लोकांनीही या ट्रॉफीचे नाव बदलण्यावरुन टीका केली होती. सचिनकडून स्वतः ईसीबीशी संपर्क साधून पतौडी हे नाव भारत-इंग्लंड क्रिकेटचा भाग राहिले पाहिजे असे सांगण्यात आले होते. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.
बीसीसीआयच्या एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, “जेव्हा ईसीबीने या ट्रॉफीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा तेंडुलकरने त्यांच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की पतौडी हे नाव भारत-इंग्लंड स्पर्धेचा भाग राहिले पाहिजे. या चर्चेत जय शाह यांनी देखील सहभाग घेतला होता. ईसीबीने विनंती मान्य केली आहे आणि विजेत्या कर्णधाराला पतौडी पदक देण्याचा निर्णय घेतला आहे.”
पूर्वी नियोजित कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे आता ट्रॉफीचे नाव बदलण्याची औपचारिक घोषणा ही १९ जून रोजी लीड्समध्ये मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्याच्या एक दिवस आधी करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज खेळाडू आहे, तर अँडरसन हा कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. पतौडी कुटुंबाचे भारत-इंग्लंड क्रिकेटशी खूप खोल संबंध राहीले आहेत. इफ्तिखार अली खान पतौडी आणि त्यांचा मुलगा मन्सूर या दोघांनी देखील भारताचे कर्णधारपद भूषवले आणि दोघेही इंग्लंडमध्ये बराच काळ काउंटी क्रिकेट खेळलेले आहेत.