तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 Rankings : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळली जात आहे. या दरम्यान आयसीसीकडून नवीनतम टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. भारताचा स्फोटक अभिषेक शर्माने आपली दहशत कायम राखली आहे. तर तिलक वर्माने देखील आपल्या क्रमवारीत चांगली कामगिरी बजावली आहे. दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : Messi India Tour : मेस्सीच्या शो दरम्यान गोंधळ प्रकरण! क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी दिला राजीनामा
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने ताज्या आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिले स्थान अबाधित राखले आहे. त्याचे रेटिंग ९०९ वर पोहोचले असून ते कोणत्याही फलंदाजासाठी एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अभिषेकने अव्वल स्थानावर आपली पकड अधिक मजबूत करण्यात यश मिळवले आहे. इंग्लंडचा फिल साल्ट ८४९ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. श्रीलंकेचा पथुम निस्सांका ७७९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे.
भारतीय युवा फलंदाज तिलक वर्माने ताज्या क्रमावरीत दोन स्थानांनी झेप घेऊन तो चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता ७७४ असून अलिकडच्या सामन्यांमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे थेट टॉप चारमध्ये पोहोचला आहे. ही वाढ आगामी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.
तिलक वर्माच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम इतर काही फलंदाजांवर देखील झालेला दिसून येत आहे. इंग्लंडच्या जोस बटलरला एका स्थानाचा फटका बसला आहे. तो आता ७७० च्या रेटिंगसह पाचव्या स्थानी गेला आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान देखील ७५२ च्या रेटिंगसह सहाव्या स्थानावर मागे सरकला आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्शला एका स्थानाने वर गेला आहे. तो आता ६८४ च्या रेटिंगसह आठव्या स्थानावर पोहचला आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट देखील दोन स्थानांनी पुढे गेला आहे. तो आता ६८३ च्या रेटिंगसह नवव्या स्थानावर पोहचला आहे.
भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ही रँकिंग चिंतेचे कारण ठरली आहे. एकेकाळी टी-२० क्रमवारीत नंबर वन फलंदाज असलेला सूर्या आता टॉप १० मधून बाहेर पडण्याच्या जवळ येऊन पोहचला आहे. तो एका स्थानाने घसरला आहे आणि ६६९ रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे.






