प्रियांश आर्य(फोटो-सोशल मीडिया)
CSK vs PBKS : काल ८ एप्रिल मंगळवार रोजी आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १८ धावांनी पराभव केला आहे. या हंगमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा लागोपाठ चौथा पराभव ठरला आहे. सामन्यापूर्वी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २१९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात चेन्नई संघाला ५ गडी गामावत २०१ धावाच करता आल्या. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबजच्या प्रियांश आर्यच्या ताबोडतोब शतकाच्या जोरावर पंजाबने २१९ धावापर्यंत मजल मारली होती. प्रियांश आर्यने ठोकलेल्या शतकामुळे तो सध्या चांगला चर्चेत आला आहे. सर्वांकडून त्याचे कौतुक होताना दिसत आहे.
हेही वाचा : KKR vs LSG : ‘मी काही बोललो तर अराजकता…’ ; एलएसजीविरुद्धच्या परभवानंतर केकेआरचा कर्णधार संतापला
प्रियांशने आयपीएल २०२५ मध्ये त्याने पदार्पणाच्या सामन्यातच वेगवान ४७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने काल झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत १०३ धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. धोकादायक ठरत जाणाऱ्या आर्यला नूर अहमदने त्याला माघारी पाठवले. आयपीएलमध्ये त्याचे हे पहिलेच शतक ठरले आहे. तसेच सर्वात जलद शतक लगावणारा प्रियांशआर्य हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर युसूफ पठाण असून ज्याने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना ३७ चेंडूमध्ये शतक लगावले होते.
मूळचा दिल्लीचा असणारा आक्रमक सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यला आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने ३.८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) स्पर्धेत साउथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना त्याने १० डावात ६०८ धावा केल्या होत्या. त्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली प्रीमियर लीगमध्ये प्रियांशने विशेष छाप पाडली. या लीगमध्ये त्याने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारण्याची किमया साधली होती.
हेही वाचा : PBKS vs CSK : CSK विरुद्ध ‘किंग’ ठरल्यानंतरही पंजाबच्या खेळाडूला दणका! BCCI सोबत नडणे पडले महागात
तसेच २०२३-२४ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रियांश दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता. त्याने सात डावांमध्ये ३१.७१ च्या सरासरीने आणि १६६.९१ च्या स्ट्राईक रेटने २२२ धावा चोपल्या होत्या. त्यांची आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी निवड करण्यात आली होती, परंतु, त्याला कोणी खरेदी केले नाही.