इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे पारपडलेली यंदाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ही चांगलीच चर्चेत राहिली. या ११ दिवस चाललेल्या स्पर्धेत ७२ देशांच्या ५ हजारापेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या अंती भारत (India) ६१ पदक जिंकून पदक (Medal) मालिकेत चौथ्या स्थानावर असून भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे सर्वदूर कौतुक होत आहे. यंदा भारताने मिळवलेल्या पदकांमध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसारख्या प्रतिष्ठीत आणि मोठ्या स्पर्धांमध्ये सर्वात आकर्षण हे त्या स्पर्धेत मिळणारे पारितोषिक म्हणजेच “पदक” अथवा “मेडल” हे असते. एखाद्या खेळाडूने पदक पटकावल्यावर त्या पदकासह त्याचा फोटो विविध माध्यमांद्वारे प्रदर्शित केला जातो. यापैकी एका फोटोत खेळाडू आपले पदक जिंकल्यावर ते तोंडात घेऊन दाताने चावताना पाहावयास मिळतात. खेळाडूंच्या मेडल चावण्यामागे नक्की काय कारण आहे याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
ऑलिम्पिक इतिहासकारांच्या आंतरराष्ट्रीय सोसायटीचे अध्यक्ष डेव्हिड व्हॅलेकिन्स्की यांनी ‘द कम्पलीट बुक ऑफ द ओलंपिक्स’ या पुस्तकातून खेळासंदर्भात बऱ्याच गोष्टींची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी खेळाडू मेडल का चावतात? याबाबत सीएनएनशी बोलताना सांगितले की, हे फोटोग्राफर्समुळे होते. ते म्हणाले, ”मला वाटते की क्रीडा पत्रकार हे एक आयकॉनिक फोटो म्हणून त्याच्याकडे पाहतात, त्यांना त्यांचे फोटो काहीहीतरी हॅपनिंग हवे असतात, ज्याचा ते सेल करु शकतील. त्यामुळे त्यांनी ही पोज तयार केली आहे. ज्यामुळे फक्त एक पोज म्हणून खेळाडू हे मेडल चावतात. त्याव्यतिरीक्त महत्त्वाचं कोणतंही कारण नाही.” असे डेव्हिड व्हॅलेकिन्स्की यांनी स्पष्ट केले.