(फोटो- hockeyindia)
तनुचा यवतमाळ येथून सुरू झालेल्या प्रवासात अनेक अडथळे आले; मात्र तिचे हॉकीबद्दल असलेले प्रेम आणि खेळाप्रती असलेली जिद्द यांच्या जोरावर तिने भारतीय अंडर-२० टीमपर्यंतचा प्रवास गाठला. यावेळी तिचे वडील दिनेश कडू यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, “आम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच मानला नाही. मोठी मुलगी परभणीला वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर धाकट्या तनूला खेळात मज्जाव केला नाही. तिच्या डोळ्यात हॉकीचे एक वेगळेच वेड होते. पैसा नसताना तिचे स्वप्न तुटू नये म्हणून आम्ही रक्ताचे पाणी केले, आज तिने आमच्या कष्टाचे चीज केले.” तर आईला मुलीच्या यशाबद्दल विचारले असता त्यांचे अश्रू अनावर झाले.
लोहारा ते लंडन: तनुश्रीचा थक्क करणारा प्रवास
शाळेत असताना हॉकी प्रशिक्षक शाहिद सय्यद यांनी तनुश्रीच्या पायांमधील वेग आणि हातांमधील स्कील ओळखले. त्यांनीच तिच्यातील कौशल्याला पहिली योग्य दिशा दिली. तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथील अभयंकर कन्या शाळा येथे झाले. त्यानंतर २०२२ मध्ये तिची पुण्यातील ‘क्रीडा प्रबोधिनी’त निवड झाली. येथे तिने कॉमर्स या विषयात उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना २२-२३ या वर्षी १२ वी उत्तीर्ण केली. तसेच त्यानंतर पुढील शिक्षण एसएनडीटी (SNDT) येथे घेतले. वर्ष २०२४ मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) तिच्यातील अफाट गुणवत्ता पाहून मुंबईच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात (NCOE) तिची निवड केली. याच टप्प्याने तिच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले केले.
हा देश माझा आहे आणि कामगिरी १०० टक्के असेल!
“माझ्या यवतमाळपासून ते पुणे, मुंबई आणि बेंगळुरूपर्यंत ज्या ज्या गुरुजींनी, प्रशिक्षकांनी आणि हितचिंतकांनी मला अंगाखांद्यावर खेळवून मार्गदर्शन केले, हे यश त्या प्रत्येकाचे आहे. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय जर्सी घालून देशाचा तिरंगा उंच करण्यासाठी मी माझे १०० टक्के योगदान देईन.”
— तनुश्री कडू, नवनियुक्त आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, भारत.
Men’s U18 Asia Cup: सुवर्णिम कामगिरी! जपानला नमवत ‘भारत अंडर-18 आशिया कपचा’ विजेता
३ तारखेला भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार
मिळालेल्या माहितीनुसार, हॉकी इंडियाने ५ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत युनायटेड किंगडमच्या (UK) दौऱ्यावर जाणाऱ्या २४ सदस्यीय भारतीय कनिष्ठ महिला संघाची घोषणा केली आहे. नवीन प्रशिक्षक टिम व्हाईट यांच्या मार्गदर्शनाखाली, हा संघ ‘ज्युनिअर आशिया कप’सह आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये सात सामने खेळणार आहे. याकरिता सध्या बेंगळुरू येथे संघाचा सराव सुरू आहे. तसेच ३ तारखेला हा संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.






