Photo Credit- pinterest
DTH सर्विस प्रोव्हायडर डिश टीव्हीने आता स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये जोरदार एंट्री केली आहे. कंपनीने भारतात VZY (Vibe, Zone & You) स्मार्ट टीव्ही सिरीज सादर केली आहे. या सिरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये DTH आणि OTT कंटेंट एकाच वेळी उपलब्ध होणार असल्याने, ग्राहकांना वेगळा सेट-टॉप बॉक्स घेण्याची गरज नाही. DTH कडून कमी होणारा ग्राहकांचा कल पाहता, डिश टीव्हीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
किंमत आणि फिचर्स
डिश टीव्हीची ही नवीन स्मार्ट टीव्ही सिरीज HD आणि 4K UHD (अल्ट्रा एचडी) रेझोल्यूशन डिस्प्लेसह येते. या सिरीजमध्ये 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साईजचे VZY टीव्ही बाजारात आले आहेत. त्यांची किंमत 12,000 रुपये ते 45,000 रुपयांच्या दरम्यान आहे. हे स्मार्ट टीव्ही गुगलच्या Android TV प्लॅटफॉर्म आणि Google TV इंटरफेसवर चालतात. लवकरच डिश टीव्ही स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आणणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
डिश टीव्हीने या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये DTH आणि OTT कंटेंटला एकत्र आणले आहे. यामुळे, ग्राहक टीव्हीसोबतच डिश टीव्हीचे लाइव्ह चॅनेल पाहू शकतात आणि त्याच वेळी गुगल प्ले स्टोरवरून त्यांचे आवडते OTT ॲप्स डाऊनलोड करू शकतात. टीव्ही खरेदी केल्यावर लाइव्ह टीव्ही पाहण्यासाठी स्वतंत्रपणे DTH कनेक्शन घेण्याची गरज नाही.
स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यावर तुम्हाला डिश टीव्हीचे सबस्क्रिप्शन मिळते, तर OTT सबस्क्रिप्शनसाठी मात्र स्वतंत्रपणे पैसे भरावे लागतील. या सिरीजमधील 32-इंच मॉडेलमध्ये HD रेझोल्यूशन डिस्प्ले आहे, तर इतर दोन्ही मॉडेल्समध्ये 4K UHD रेझोल्यूशन मिळेल. डिश टीव्हीचा हा स्मार्ट टीव्ही ऑफलाइन रिटेलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिश टीव्हीचा स्वतःचा Watcho नावाचा OTT प्लॅटफॉर्म असून, तो या टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल्ड असू शकतो.