whatsapp (Photo Credit- File)
तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट बनवायचे असेल, तर आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज राहणार नाही. दिल्ली सरकार एका नवीन उपक्रमावर काम करत आहे, ज्यामुळे ही सर्व कामे तुम्ही घरबसल्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) च्या माध्यमातून करू शकणार आहात. या अनोख्या उपक्रमाला ‘व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स’ (WhatsApp Governance) असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सरकारी कामांसाठी लांब रांगेत उभे राहण्याची किंवा कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही.
या नवीन उपक्रमांतर्गत विवाह प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या अनेक सरकारी सेवांचा समावेश केला जाईल. लोक व्हॉट्सअॅपद्वारेच या कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतील, त्यांचे अर्ज व्हेरिफाय करू शकतील आणि कागदपत्रे डाऊनलोडदेखील करू शकतील. यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद होईल आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या कमी होतील. तसेच, यामुळे भ्रष्टाचार कमी होण्याचीही आशा आहे.
WhatsApp Governance प्लॅटफॉर्मवर AI-पावर्ड चॅटबॉट असेल. हा चॅटबॉट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये काम करेल. तो युजर्सना मदत करण्यासोबतच संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित (ऑटोमॅटिक) करेल आणि सर्व सरकारी विभागांशी संबंधित माहितीही देईल. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर २५ ते ३० सेवांचा समावेश केला जाईल आणि हळूहळू इतर विभागदेखील जोडले जातील. चांगल्या समन्वयासाठी, या प्लॅटफॉर्मला दिल्लीच्या ई-डिस्टिंक्ट पोर्टलशी जोडले जाईल.
सध्या या प्लॅटफॉर्मवर काम सुरू आहे आणि ते कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एकदा हे लाँच झाल्यानंतर, युजर्सला चॅटबॉटला फक्त ‘Hi’ असा मेसेज पाठवून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. चॅटबॉट युजर्सला एक फॉर्म देईल. हा फॉर्म भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अपलोड करायची आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी असणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल.