Mahakumbh 2025: महाकुंभात दिसणार टेक्नोलॉजीची जादू, लाईव्ह स्ट्रिमिंगवर पाहता येणार पेशवाई, शाही स्नान आणि गंगा आरती
प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. 13 जानेवारीपासून सुरु होणार हा महाकुंभ 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. दर 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो, ज्यात जगभरातून करोडो भाविक येतात. यंदा महाकुंभाला 45 कोटी लोकं उपस्थित राहणार आहेत. यंदा आयोजित केला जाणारा महाकुंभ हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव नसून तो अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम देखील असणार आहे. कुंभमेळ्यात भक्ति-भावासोबत तंत्रज्ञानाची एक अनोखी जोड पाहायला मिळणार आहे.
महाकुंभ 2025 खास असेल, कारण पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. कुंभमेळ्यात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे येथे भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना योग्य माहिती देण्यासाठी वर्चुअल रियलिटी, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुविधांचा वापर केला जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी AI च्या मदतीने त्यांच्यासाठी पार्किंगची सोय केली जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
महाकुंभात पेशवाई, शाहीस्नान, गंगा आरती आदी पूर्णपणे नव्या शैलीत पाहण्याची संधी मिळणार आहे. येथे, भक्तांसाठी 10 विशेष व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) स्टॉल्स उभारले जातील, जिथे पेशवाई (आखाड्यांची भव्य मिरवणूक), शाही स्नान, गंगा आरती आणि इतर मोठे कार्यक्रम 360 डिग्री वर्चुअल रियलिटी अनुभवासह दाखवले जातील. या ऐतिहासिक सोहळ्याचा प्रत्येक क्षण भाविकांना अनुभवता यावा, यासाठी कुंभमेळ्याच्या विशेष ठिकाणी हे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
महाकुंभला 45 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडक सायबर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
सायबर पोलिस स्टेशन: बनावट वेबसाइट्स, सोशल मीडिया स्कॅम आणि बनावट लिंक्स यांसारख्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे भाविकांची फसवणूक केली जाणार नाही.
56 सायबर वॉरियर्स: 56 सायबर डेडिकेटेड सायबर वॉरियर्स ऑनलाइन धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
VMD (व्हेरिएबल मेसेजिंग डिस्प्ले): कुंभमेळ्यात आणि आसपास 40 डिजिटल डिस्प्ले स्थापित केले जातील, जे सायबर सुरक्षेशी संबंधित जागरूकता पसरवतील.
हेल्पलाइन 1920: भाविकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 1920 जारी करण्यात आला आहे.
प्रत्येकाची इच्छा असते की 12 वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या महाकुंभाला आपण उपस्थित राहावं, पण सर्वांनाच हे शक्य होतं असं नाही. तुम्हाला देखील महाकुंभला जाण्याची इच्छा असेल पण जाता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. महाकुंभ 2025 चे विविध कार्यक्रम दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ (AIR) या सरकारी माध्यम प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रक्षेपित केले जातील. त्यामुळे घरात बसूनही लोकांना महाकुंभाची भव्यता बघता येणार आहे.
महाकुंभ 2025 केवळ भाविकांसाठी श्रद्धा आणि संस्कृतीचे केंद्र बनणार नाही, तर तंत्रज्ञानाचा नवा अनुभव देखील देणार आहे. वर्चुअल एक्सपीरियंस, सायबर सिक्योरिटी आणि लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून हा महाकुंभ परंपरा आणि आधुनिकतेचे उत्तम उदाहरण ठरेल.