YouTube मोनेटाइजेशन नियमात मोठा बदल! बड्या युट्यूबर्सच्या कमाईला लागणार आता ब्रेक, काय आहे निर्णयामागचं कारण?
लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट उपलब्ध आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत युट्यूबवर सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. यातील काही व्हिडीओ कंटेट क्रिएटर्स आणि युट्यूबर्सनी स्वत: मेहनत करून बनवलेले असतात तर काही व्हिडीओ AI च्या मदतीने तयार केले जातात. आता प्लॅटफॉर्मवरील याच सर्व व्हिडीओंबाबत युट्यूबने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आता त्यांच्या मॉनेटाइजेशन नियमांत बदल केला आहे. हे नवे नियम 15 जुलैपासून लागू केले जाणार आहेत.
कंपनीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, आता अशा युट्यूबर्सच्या कमाईला ब्रेक लागणार आहे, जे AI च्या मदतीने व्हिडीओचा कंटेट तयार करतात आणि व्हिडीओ अपलोड करतात. नव्या नियमांनुसार, आता अशाच युट्यूबर्सना पेमेंट दिला जाणार आहे, जे त्यांच्या खऱ्या आवाजात आणि ओरिजिनल कंटेटमध्ये व्हिडीओ तयार करतात. म्हणजेच आता कॉपी कंटेट, कमी मेहनलवाले व्हिडीओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने तयार केलेल्या व्हिडीओ स्विकारले जाणार नाही. आता अशा व्हिडीओंना पेमेंट देखील दिला जाणार नाही. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अनेक युट्यूबर्सची कमाई थांबणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेटची क्वालिटी वाढावी आणि जास्तीत जास्त ओरिजिनल व्हिडीओ अपलोड व्हावेत, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अनेकदा असं होतं की, युट्यूबर्स दुसऱ्यांचे व्हिडीओ कॉपी करून अपलोड करतात किंवा AI टूल्सने तयार केलेले व्हिडीओ अपलोड करून पैसे कमावतात. पण यामुळे जे युट्यूबर्स मेहनत करून त्यांचा कंटेट तयार करतात आणि व्हिडीओसाठी मेहनत करतात, त्यांची कमाई कमी होते. या सर्वांचा विचार करून आता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
ओरिजिनल कंटेंटचा अर्थ असा आहे की, युट्यूबवर अपलोड केला जाणारा व्हिडीओ क्रिएटरने स्वत: तायर केलेला असावा, या व्हिडीओमध्ये क्रिएटर्सचा खरा आवाज असणं आवश्यक आहे. व्हिडीओमध्ये प्रत्येक क्षणी क्रिएटरची मेहनत आणि क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे. अशाच व्हिडीओंना आता युट्यूबद्वारे पैसे दिले जाणार आहेत.
कंपनीने घेतलेला हा निर्णय फायद्याचा असला तरी त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत जे क्रिएटर्स AI च्या मदतीने व्हिडीओ तयार करत होते, आता त्यांना त्यांच्या धोरणात बदल करावा लागणार आहे. छोट्या आणि नव्या क्रिएटर्सना ओरिजिनल कंटेंट बनवताना सुरुवातीला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आवाज खरा असणं आवश्यक आहे, याचा अर्थ व्हॉइसओव्हर किंवा डबिंग असलेल्या व्हिडिओंमध्ये कमाईच्या समस्या येऊ शकतात.