(फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे. उन्हाळ्याच्या या कडक वातावरणात अनेकजण कोणत्या ना कोणत्या थंड ठिकाणाला भेट देण्याचा प्लॅन बनवत असतात. शिवाय याच सीजनमध्ये लहान मुलांना सुट्ट्या देखील सुरु होतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा हा एक उत्तम काळ आहे. अशात तुम्हीही जर तुमच्या कुटुंबासह कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास ठिकाण घेऊन आलो आहोत, या ठिकाणाला भारतचे स्कॉटलँड असे म्हटले जाते. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे…
स्कॉटलँड किती सुंदर आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. युरोपमधील युनायटेड किंग्डम इथे वसलेले हे ठिकाण दरवर्षी अनेक परदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते मात्र इथे जाणे काही सोपे नाही. यासाठी तुम्हाला भारीभक्कम रक्कम मोजावी लागेल अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, स्कॉटलँडच्या सुंदर दृश्यांचा आनंद तर तुम्ही भारतात देखील घेऊ शकता. भारतात असे एक ठिकाण आहे जे स्कॉटलँड च्या सौंदर्याशी स्पर्धा करते. आपण कर्नाटकातील कूर्गबद्दल बोलत आहोत. कूर्ग हे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेले एक हिल स्टेशन आहे, ज्याला ‘भारताचे स्कॉटलंड’ असेही म्हणतात. येथील हिरवळ, थंड वारा, कॉफीचे मळे आणि उंच पर्वत यामुळे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. उन्हाळ्यात कुर्ग का परिपूर्ण आहे. चला या ठिकाणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
उन्हाळ्यात पर्यटनासाठी उत्तम ठिकाण
उन्हाळ्यात कूर्गमधील तापमान १५°C ते ३५°C दरम्यान असते, ज्यामुळे कडक उष्णतेपासून आराम मिळतो. येथील थंड वारा आणि हलका पाऊस हवामान आणखी आल्हाददायक बनवतो. कुर्ग हे हिरवळीने वेढलेले जंगले, धबधबे आणि कॉफीच्या मळ्यांनी वेढलेले आहे. उन्हाळ्यात दऱ्या आणखी फुलतात, ज्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग बनते. उन्हाळ्यात कूर्गमध्ये पर्यटकांची संख्या पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे याकाळात इथे भेट दिलीत तर तुम्हाला शांततेचा अनुभव घेता येईल.
कूर्गची खासियत
कॉफीचे मळे आणि स्थानिक चवी
कूर्ग त्याच्या कॉफीसाठी प्रसिद्ध आहे. येथील कॉफी इस्टेटला भेट देऊन, तुम्ही कॉफी बीन्सची लागवड आणि प्रक्रिया याबद्दल जाणून घेऊ शकता. याशिवाय, येथील पांडी करी, अक्की रोटी (तांदळाची भाकरी) आणि कूर्ग कॉफी फार लोकप्रिय आहे. तुम्ही इथे जात असाल तर या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
एडवेंचर एक्टिविटीजची घेता येईल मजा
ताडीकोलू, कोटेबेट्टा आणि नीलाकुरिंजी टेकड्यांमध्ये तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय बारापोल नदीवर तुम्हाला राफ्टिंगची मजा लुटता येईल. हारंगी आणि कावेरी नदीच्या काठावर कॅम्पिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. कूर्गची कोडावा संस्कृती खूप अद्वितीय आहे. येथील प्रसिद्ध सण “कैलपोधू” (कापणी उत्सव) आणि “पुथारी” मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तुम्ही या उत्सवांमध्ये सामील होऊन त्यांची मजा लुटू शकता.