(फोटो सौजन्य: Instagram)
बंजी जंपिंग हा तरुणांमध्ये लोकप्रिय होत चालेलला एक साहसी खेळ आहे. यात लोक स्वत:ला एका रश्शीला बांधून भल्यामोठ्या उंचीवरुन उडी मारतात. हा एक थरारक खेळ आहे, ज्यात जीवाची शाश्वती देता येत नाही. आतापर्यंत अनेकांनी या साहसी खेळाचा अनुभव घेण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे आणि यात आणखीन एका घटनेची नोंद झाली आहे. ऋषिकेशमधून एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, यात बंजी जंपिंग करतानाचा थरार दिसला आणि यादरम्यानच घडून आलेली दुर्देवी घटनाही यात कैद झाली. व्यक्तीने बंजी जंपिंग करण्यासाठी उडी मारली खरी पण यावेळीची अचानक त्याची रश्शी तुटली आणि व्यक्ती उंचावरुन थेट जमिनीवर कोसळला. साहसी खेळाच्या नादात व्यक्तीचा जीव पणाला लागला. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं ?
व्हिडिओ बनवणारा एक इंफ्लूएंसर असून तो बंजी जंपिंग स्पाॅटजवळून जात होता. बंपी जंपिंगची मजा पाहण्यासाठी तो त्याजागी थांबला पण पुढे जे घडले त्याने त्यालाही हादरवून सोडले. पर्यटकाने स्वत:ला दोरीला बांधत उंचावरुन उडी मारली खरी पण दोरी चांगल्या दर्जाची नसल्याकारणाने ती मध्यातच तुटली आणि व्यक्ती जमिनीवर जाऊन आदळला. दोरीच्या अशा तुटण्याने त्याच्या गुणवत्तेबद्दल आणि तपासणीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघातानंतर जखमी पर्यटकाला ताबडतोब उचलून रुग्णालयात नेण्यात आले. व्हिडिओमध्ये तो बेशुद्ध आणि रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत दिसत आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बंजी जंपिंग ऑपरेटर्सकडे अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकाही नव्हती. इन्फ्लुएंसरने स्वतः जखमी व्यक्तीला त्याच्या गाडीत बसवले आणि त्याला एम्स ऋषिकेशला नेले. इन्फ्लुएंसरने हे देखील स्पष्ट केले की, आयोजकांकडे अशा घटनांसाठी कोणतीच सेफ्टी दिली जात नाही, ते आधीच साईन करुन घेतात म्हणजे अशी काही घटना घडली की मग आम्ही याला जबाबदार नाही असं म्हणायला ते मोकळे.
बंजी जंपिगच्या या वाढत्या घटनांकडे पाहता अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपला जीव पणाला लावून आपण हा आनंद घ्यायला हवा का? याचा विचार हा खेळ खेळण्याआधी प्रत्येकाच्या मनात यायला हवा. या घटनेचा व्हिडिओ @officialsujalthakral नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही एक चांगला माणूस आहात. अशा परिस्थितीत एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या पालकांना आणि आम्हा सर्वांना या कृतीचा अभिमान वाटला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, मी तुला सलाम करतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या खेळावर बहिष्कार टाका ते खूप धोकादायक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






