अंगावर काटा आणणारी दुर्घटना! दोन वर्षाचा चिमुकल्याचा २० व्या मजल्यावरुन पडून भयानक मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News in Marathi : न्यू जर्सी : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत (America) न्यू जर्सीमध्ये एका २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. २० व्या मजल्यावरुन पडून या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे, परंतु अद्याप बाळ कसे पडले याबाबत कोणताही पुरावा सापडलेला नाही.
न्यू जर्सीतील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळी एका उंच इमारतीत ही घटना घडली. शनिवारी (१५ नोव्हेंबर) स्थानिक वेळेनुसार ७ च्या सुमारास ही घटना घडली. नेवार्कच्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या बाळाचे नाव आणि त्याच्या कुटुंबातील लोकांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या हृदयद्रावक घटनेवर नेवार्कचे सार्वजनिक सुरक्षा संचालक यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून सत्य लवकरात लवकर समोर येईल असे म्हटले आहे.
सध्या या घटनेने स्थानिक जनतेमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर #JusticeForToddler असा हॅशटॅग वापरला जात आहे. इमारतीच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. एका स्थानिक नागरिकांच्या मते, पालकांच्या मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष न देण्यामुळे ही घटना घडली आहे. ही घटना एका कुटुंबासीठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे.
सध्या पोलिसांनी पालकांना खिडक्या बंद करण्याचे आणि मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. घटनेचा तपास सुरु असून सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहे. जर पालकांचा निष्काळजीपणा आढळून आला, किंवा इमारत व्यवस्थापनाबाबत कोणतीही त्रुटी समोर आली तर त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत सतत घडतात अशा घटना
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. उंच इमारतींच्या खिडक्यांमधून आतापर्यंत ५००० मुलांचा मृत्यू झाला आहे किंवा गंभीर दुखापत झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरी भागातील उंच इमारतींमुळे या घटना घडत असून सुरक्षा व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे.






