फोटो सौजन्य: iStock
वॉशिंग्टन: अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे.मॅकडोनाल्ड या प्रसिद्ध फूड चेनचा बर्गर खाल्ल्याने अनेकजण आजारी पडले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत ‘मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने E.coli बॅक्टेरियाचा संसर्ग पसरला आहे, ज्यामुळे 10 राज्यांमध्ये किमान 49 लोक आजारी पडले आहेत आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये E.coli बॅक्टेरियाचा संसर्गाची प्रकरणे समोर
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार, या संसर्गामुळे कोलोरॅडोमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येमुळे एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांमध्ये 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान कोलोरॅडो, आयोवा, कॅन्सस, मिसूरी, मॉन्टाना, नेब्रास्का, ओरेगॉन, उटाह, वायोमिंग आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये संसर्गाच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.
घटनेची चौकशी सुरू
कोलोरॅडोमध्ये सर्वाधिक 27 केसेस आढळल्या आहेत, तर नेब्रास्कामध्ये नऊ लोक बाधित झाले आहेत. CDC ने दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित लोकांनी मॅकडोनाल्डच्या ‘क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर’चे सेवन केले होते, ज्यामुळे हा संसर्ग पसरल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेचे कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि राज्यांचे आरोग्य अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. या दूषिततेचे नेमके कारण अजूनपर्यंत निश्चित झालेले नाही, परंतु तपासकर्त्यांचे लक्ष गोमांस आणि कांद्याकडे आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला
संसर्ग टाळण्यासाठी मॅकडोनाल्डने प्रभावित राज्यांमधून चिरलेले कांदे आणि गोमांस पॅटीज हटवले आहेत. यामुळे या राज्यांमध्ये मॅकडोनाल्ड बर्गर काही काळासाठी अनुपलब्ध असेल. ई. कोलाय बॅक्टेरिया प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात आणि दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतात. हा संसर्ग ताप, पोटदुखी, आणि रक्तस्त्रावयुक्त अतिसार यांसारखे गंभीर परिणाम निर्माण करतो. या घटनेनंतर मॅकडोनाल्डच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून, मंगळवारी नऊ टक्के नुकसान नोंदवले गेले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून, संसर्ग होण्यापासून बचावासाठी अन्नाचे योग्यरित्या शिजवणे आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सीडीसीच्या घोषणेनंतर मॅकडोनाल्डचे शेअर्स मंगळवारी नऊ टक्क्यांनी घसरले.
हे देखील वाचा- इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार