कोण आहे ती महिला पायलट? जिचे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या विमानाला धडकून कोसळले, अपघातात 67 जणांचा मृत्यू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्या सैन्यातील एक कुशल महिला पायलट कॅप्टन रेबेका एम. लोबॅक यांचा बुधवारी रात्री झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. वॉशिंग्टन डीसी येथे यूएस आर्मी एच-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्स सीआरजे-700 प्रवासी विमान यांची हवेत भीषण टक्कर होऊन या दुर्घटनेत 67 जणांनी आपले प्राण गमावले.
कॅप्टन रेबेका एम. लोबॅक, एक प्रतिभावान आणि धाडसी पायलट
कॅप्टन रेबेका लोबॅक या उत्तम प्रशिक्षित आर्मी एव्हिएशन अधिकाऱ्या होत्या. 28 वर्षीय रेबेका यांचे मूळ गाव डरहम, नॉर्थ कॅरोलिना असून त्या 2019 पासून अमेरिकन लष्करात कार्यरत होत्या. त्यांनी नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या आरओटीसी अभ्यासक्रमातून पदवी मिळवली होती. उत्कृष्ट शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांना देशातील अव्वल 20% कॅडेट्समध्ये स्थान मिळाले होते.
त्यांना 450 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता आणि त्यांनी सैन्यात प्लाटून लीडर आणि कंपनीच्या कार्यकारी अधिकारी म्हणूनही सेवा बजावली होती. त्यांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांमुळे आणि धाडसामुळे त्यांना कॅप्टनचा दर्जा मिळाला.
व्हाईट हाऊसच्या सेवेतही योगदान
रेबेका एम. लोबॅक यांनी केवळ सैन्यातच नव्हे, तर व्हाईट हाऊसच्या सहाय्यक पदावर कार्यरत राहून प्रशासनाच्या विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. सैन्याच्या अनेक गुप्त मोहिमांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशसोबत तणाव असतानाही भारताने 16,400 टन तांदूळ पाठवला; जाणून घ्या सरकारने का उचलले हे पाऊल?
दुर्दैवी विमान अपघात
बुधवारी रात्री, वॉशिंग्टन डीसीच्या हवाई हद्दीत अमेरिकन एअरलाइन्स सीआरजे-700 जेट आणि यूएस आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर यांची हवेत जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कॅप्टन रेबेका लोबॅक यांच्यासह एकूण 67 जणांचा मृत्यू झाला. सध्या अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि हवाई अधिकारी या अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासानुसार, तांत्रिक बिघाड किंवा हवामानाचा परिणाम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कुटुंबाच्या भावना आणि श्रद्धांजली
रेबेका यांच्या कुटुंबीयांनी एक भावनिक निवेदन जारी करत त्यांच्या मुलीच्या पराक्रमाचा आणि देशसेवेच्या समर्पणाचा अभिमान असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाने जाहीर केले की सेवानिवृत्तीनंतर रेबेकाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते.
“रेबेका आमच्या आयुष्यातील एक चमकता तारा होती. तिच्या मृत्यूनंतरही ती आमच्या हृदयात कायम राहील,” असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जेसिका बनली सायरा खातून… पाकिस्तानात चिनी तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर, मियां मिठू पुन्हा चर्चेत
एक धाडसी आणि प्रेरणादायी महिला
कॅप्टन रेबेका लोबॅक यांनी महिला पायलटसाठी एक आदर्श निर्माण केला. त्यांचे धाडस, जिद्द आणि देशसेवा हे कायम स्मरणात राहतील. संपूर्ण अमेरिका या भीषण अपघाताने शोकसागरात बुडाली असून त्यांच्या बलिदानाला सलाम करत आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना.