ट्रम्प यांच्या गाझा योजनेला तोंड देण्यासाठी अरब देश एकत्र; सौदी अरेबियात लवकरच होणार बैठक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रियाध: सध्या गाझाचा पुनर्विकासावरुन मोठे युद्ध सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे वसाहती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या धोरणाला अनेक युरोपीय देशांकडून विरोध होत आहे. दरम्यान सौदी अरेबियाने आता या मुद्द्यावर चर्चा घेण्यासाठी 21 फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे. या बैठकीत इजिप्त, जॉर्डन आणि इतर आकीती देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या बैठकीसाठी रियाध येथे नेत्यांना आमंत्रित केले आहे. गाझा पट्टीवरील शासन आणि पुनर्निर्माणासाठी निधी उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझावरील ताबा मिळवण्याच्या योजनेला तोंड देण्यासाठी ही बैठक होणार आहे.
गाझावर नियंत्रण आणि पुनर्निर्माणाचा प्रश्न
मीडिया रिपोर्टनुसार, ही एक अनौपचारिक बैठक असणार आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा पट्टीवरील प्रस्तावामुळे अरब देशांमध्ये संताप उसळला आहे. गाझा पट्टीवर नेमके कोणाचे नियंत्रण असावे आणि पुनर्निर्माणासाठी निधी कसा उभारावा, याबाबत अरब देशांमध्ये अजूनही असहमती आहे.
अरब देशांचा गाझा पुनर्निर्माणासाठी निर्णय?
सौदी अरेबियाचे परराष्ट्र धोरण तज्ञ उमर करीम यांनी बैठकीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गाझाच्या पुनर्विकासासाठी सुमारे 53 अब्ज डॉलर्सची गरज पडणार असून यातील 20 अब्ज डॉलर्स येत्या तीन वर्षात खर्च होतील. हा निधी कसा जमा करावा आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे यावर अरब देशांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा वादग्रस्त प्रस्ताव
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीतील 23 लाख लोकांना इजिप्त आणि जॉर्डनमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावामुळे जागतिक स्तरावर टीकेची लाट उसळली असून अनेक देशांनी या योजनेचा विरोध केला आहे. इजिप्तने देखील गाझा पट्टीसाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे संकेत दिले आहेत.
इजिप्तची गाझा पुनर्बांधणीसाठी सुरुवात
सध्या इजिप्तने गाझाच्या परिसरात काही सुरक्षित ठिकाणे उभारली जात असून सुरुवातीच्या टप्प्यात पॅलेस्टिनी नागरिक राहू शकतील. याशिवाय, इजिप्त आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बांधकाम कंपन्या गाजा पट्टीत पायाभूत सुविधांच्या पुनर्निर्माणासाठी काम करतील असे इजिप्तने म्हटले होते.
मात्र, 21 फेब्रुवारी 2025 ला होणाऱ्या अरब देशांच्या बैठकीत गाझा पट्टीच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक निधी उभारण्याची रणनीती ठरवली जाणार आहे. अरब नेत्यांचा गाझा प्रश्नावर एकत्र येण्याचा प्रयत्न चालू असून, या चर्चेचा परिणाम पुढील अरब-फिलिस्तीन संबंधांवर होणार आहे.






