भारताविरुद्ध मोठे षड्यंत्र! पाकिस्तानचे 'या' देशाला भेटणे धोकादायक; CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
CDS Anil Chauhan : भारताविरुद्ध चालवण्यात येणाऱ्या षड्यंत्रामध्ये पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूराष्ट्रांची भूमिका दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. भारताचे मुख्य संरक्षण प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी या गंभीर विषयावर भाष्य करत पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या सहकार्यामुळे भारताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे.
‘द हिंदू’ला दिलेल्या एका महत्त्वाच्या मुलाखतीत सीडीएस चौहान म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानला चीनकडून ७० ते ८० टक्के शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्री मिळाली आहे. हे फक्त सौदे किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नाहीत, तर भारताविरुद्ध आखण्यात आलेल्या दीर्घकालीन युद्धनीतीचा भाग आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, दक्षिण आशियामध्ये सतत बदलणाऱ्या सरकारांमुळे या भागातील भू-राजकीय (Geopolitical) समीकरणेही सतत बदलत आहेत. या बदलांमुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीक वाढते आहे आणि ही एक नवीच आव्हाने भारतापुढे उभी करत आहे. सीडीएस चौहान यांनी हिंद महासागर परिसरातील देशांच्या आर्थिक संकटावरही लक्ष वेधले. “जेव्हा देश आर्थिक अडचणीत सापडतात, तेव्हा बाह्य शक्तींना आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळते. याचा परिणाम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही होतो,” असं ते म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा’ देश बनवत आहे जगातील सर्वात घातक 6th जनरेशन ‘F-47’ लढाऊ विमान; 5 महिन्यांपासून गुप्त चाचण्या सुरू
सीडीएस चौहान यांचा हा इशारा त्या घटनांनंतर आला आहे ज्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान घडल्या. पहलगाममध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जोरदार कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध आक्रमणाची तयारी केली होती.
यावेळी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनीही पाकिस्तानच्या हालचालींबाबत सतर्कता व्यक्त करत सांगितले की, पाकिस्तानला चीनकडून तांत्रिक व लष्करी मदत मिळत आहे. चीनकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तानची युद्धसज्जता अधिक बळकट झाली आहे.
जागतिक स्तरावरही सुरक्षेची स्थिती चिंताजनक बनली आहे, असं सांगताना सीडीएस चौहान यांनी अमेरिका या महाशक्तीवरही टीका केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, जागतिक सुरक्षेला लागलेला ताण आणि अस्थिरता यामागे अमेरिकेच्या धोरणांचा मोठा वाटा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nimisha Priya Death Sentence: निमिषा प्रियाला 16 जुलैला येमेनमध्ये फाशी! भारतीय नर्सच्या संघर्षाची ‘हि’ हृदयद्रावक कहाणी
भारताला आता केवळ सीमारेषेवरच नाही, तर राजनैतिक, आर्थिक आणि रणनीतिक पातळीवरही सजग राहावं लागणार आहे. पाकिस्तान-चीन युती आणि बांगलादेशातील संभाव्य हस्तक्षेप हे भारताच्या सुरक्षेसाठी नव्या चिंता घेऊन आले आहेत. सीडीएस अनिल चौहान यांचा इशारा केवळ सावधगिरीचा नाही, तर भविष्यातील धोरण ठरवण्याचा स्पष्ट संकेत आहे.