Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Hangor Submarine : चीन-पाकिस्तानमधील संरक्षण सहकार्याचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला असून, पाकिस्तानला ‘तिसरी हँगोर-क्लास पाणबुडी’ ( Third Hangor-class submarine ) चीनने अधिकृतपणे सोपवली आहे. या निर्णयामुळे हिंदी महासागरातील सागरी समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, भारतासाठी हे एक मोठे आव्हान ठरणार असल्याचे तज्ज्ञ मानतात.
शनिवारी (१६ ऑगस्ट २०२५) चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्स वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी चीनच्या वुहान शहरात झालेल्या भव्य समारंभात पाकिस्तानकडे हस्तांतरित करण्यात आली. याआधी याच मालिकेतील दुसरी पाणबुडी मार्च महिन्यात पाकिस्तानला मिळाली होती. एकूण आठ पाणबुड्या देण्याचे चीन-पाकिस्तान करार झाले असून, हा करार इस्लामाबादच्या नौदल सामर्थ्यवृद्धीचा महत्त्वाचा भाग आहे.
गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानला चार आधुनिक युद्धनौका, अत्याधुनिक लढाऊ विमाने तसेच विविध क्षेपणास्त्र प्रणाली पुरवल्या आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या एकूण लष्करी उपकरणांपैकी तब्बल ८१ टक्के चीनकडून पुरवले गेले आहेत. २०२२ मध्ये चीनने पाकिस्तानला संयुक्त निर्मितीतील JF-१७ लढाऊ विमानांव्यतिरिक्त, अत्याधुनिक J-१०CE बहुउद्देशीय विमानेही दिली होती. अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षात या विमानांचा वापर झाल्याची नोंद आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
हँगोर पाणबुडी ही चीनची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित युद्धनौका आहे. चीनी लष्करी तज्ञ झांग जुनशे यांच्या मते, या पाणबुडीची काही ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत:
प्रगत सेन्सर प्रणाली
अत्युत्कृष्ट स्टिल्थ (लपून हल्ला करण्याची क्षमता)
उच्च युक्ती व हालचालींची क्षमता
एकदा इंधन भरल्यानंतर बराच काळ पाण्याखाली कार्यरत राहण्याची क्षमता
तीव्र अग्निशक्ती व शत्रूच्या युद्धनौकांना निष्प्रभ करण्याची ताकद
तिसऱ्या हँगोर पाणबुडीच्या लाँचिंगवेळी पाकिस्तानचे उप-नौदल प्रमुख, व्हाइस अॅडमिरल अब्दुल समद यांनी म्हटले की,
“ही पाणबुडी प्रादेशिक शक्ती संतुलन राखण्यासाठी तसेच सागरी स्थिरता टिकवण्यासाठी महत्त्वाची ठरेल. आधुनिक शस्त्रसामग्री आणि सुधारित सेन्सर तंत्रज्ञानामुळे पाकिस्तान नौदलाची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
अरबी समुद्र व हिंदी महासागरातील चीन-पाकिस्तानची वाढती उपस्थिती भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. बलुचिस्तानातील ग्वादर बंदराच्या आधारे चीनने या भागात नौदल उपस्थिती मजबूत केली आहे. अशा पार्श्वभूमीवर, पाकिस्तानकडे मिळालेली हँगोर पाणबुडी भारताच्या सागरी सुरक्षेसाठी नवे आव्हान निर्माण करते. लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दक्षिण आशियातील सागरी सामर्थ्य संतुलन आता बदलू शकते. चीन-पाकिस्तानची वाढती भागीदारी ही फक्त संरक्षणपुरती मर्यादित नसून, रणनीतिक दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न असल्याचे ते मानतात.