'जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…' शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump Xi Taiwan assurance : अमेरिका-चीन संबंध पुन्हा एकदा जगाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि तैवानच्या प्रश्नावर धाडसी विधान करत जागतिक राजकारणात नवी खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांना स्पष्टपणे आश्वासन दिले आहे “जोपर्यंत तुम्ही (ट्रम्प) राष्ट्रपती आहात, तोपर्यंत चीन तैवानवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाही.”
शुक्रवारी (१५ ऑगस्ट २०२५) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी होणाऱ्या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले
“मी तुम्हाला सांगतो की शी जिनपिंग आणि तैवानमध्ये नक्कीच गंभीर परिस्थिती आहे. पण जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत काहीही घडणार नाही, असे मला वाटते. चीनचे अध्यक्ष यांनीही मला याची खात्री दिली आहे.”
ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले की, जिनपिंग म्हणाले होते “मी हे कधीही करणार नाही, कारण तुम्ही अजूनही राष्ट्रपती आहात.” त्यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले “हे खूप चांगले आहे, मी याचे कौतुक करतो.” मात्र त्यांनी हेही सांगितले की, जिनपिंग यांनी स्वतःला संयमी आणि धीर धरून पाऊल टाकणारा नेता म्हणून वर्णन केले आहे.
ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात यावर्षी जूनमध्ये त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली औपचारिक चर्चा झाली होती. एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्याशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला होता, परंतु तो संवाद नेमका कधी झाला हे त्यांनी सांगितले नव्हते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले
चीन नेहमीच तैवानला आपला भाग मानत आला आहे. लोकशाही पद्धतीने चालणारे हे बेट चीनच्या राजवटीपासून स्वतंत्र राहिले आहे. मात्र बीजिंगचे मत असे आहे की, “एका चीन”च्या धोरणांतर्गत तैवान पुन्हा देशात विलीन व्हायलाच हवा. आवश्यक पडल्यास यासाठी बलाचा वापर करण्यासही चीन तयार आहे. तैवानने चीनच्या या दाव्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याचवेळी, अमेरिकेने वारंवार तैवानला पाठिंबा दिल्यामुळे बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील तणाव कायम वाढतच आहे.
याच संदर्भात अमेरिकेतील चिनी दूतावासाने शुक्रवारी (१५ ऑगस्ट) निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी स्पष्ट केले की, तैवान हा चीन-अमेरिका संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. अमेरिकेने या विषयावर “जबाबदार भूमिका” घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान केवळ अमेरिका-चीन संबंधांसाठीच नव्हे, तर संपूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रातील स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तैवान प्रश्नामुळे उद्भवणाऱ्या युद्धाच्या शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने हा संदेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र ट्रम्प यांच्या या दाव्याची पुढील काळात खरी कसोटी लागेल, कारण चीनची धोरणे दीर्घकालीन व अप्रत्याशित राहिली आहेत.