फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाने पेंटागॉनने पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आणि चीनच्या लष्करी सामर्थ्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालावरुन चीनने तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भ्रष्टाचारामुळे PLA च्या आधुनिकीकरणामध्ये अडथळे येत आहेत. मात्र, चीनने या आरोपांना फेटाळून लावले आहे. चीनने म्हटले आहे की, पेंटागॉनवर खोट्या कहाण्या रचल्याचा आणि चीनच्या धोरणांची चुकीची व्याख्या केल्याचा आरोप केला आहे.
चीनच्या लष्करी क्षमतेला कमी समजण्यात आले आहे
चीनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग शियाओगांग यांनी म्हटले आहे की, पेंटागॉनच्या या अहवालामुळे चीनच्या लष्करी धोरणांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले की, चीनच्या लष्करी क्षमतेबद्दल चुकीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, चीनच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप करण्यात आला आहे, तसेच चीनद्वारे निर्माण होणाऱ्या तथाकथित लष्करी धोक्याला मोठ्या प्रमाणावर वाढवून दाखवण्यात आले आहे. त्यांनी यावर कडक नाराजी व्यक्त करत अमेरिकेला या प्रकारच्या खोट्या कहाण्या रचणे थांबवण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक शांतता आणि स्थैर्याला धोका
शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने झांग यांचे वक्तव्य उद्धृत करताना म्हटले की, गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका अशा प्रकारच्या अहवालांच्या माध्यमातून चीनविरोधी प्रचार करत आहे. झांग यांनी स्पष्ट केले की, चीनचे परमाणु शस्त्रागार देशाच्या सुरक्षेसाठी आहेत, तर अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा आणि प्रगत परमाणु शस्त्रसाठा असूनही, ती ‘पहिल्या वापर’ धोरणावर ठाम आहे, ज्यामुळे जागतिक शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होत आहे.
चीन-अमेरिका संबंधांमध्ये आणखी तणाव
पेंटागॉनच्या 165 पानी अहवालात चीनच्या लष्करी आधुनिकीकरणातील अडथळे, विशेषतः भ्रष्टाचाराचे मुद्दे उघड केले आहेत. अहवालानुसार, भ्रष्टाचारामुळे चीनच्या संरक्षण प्रकल्पांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. झांग यांनी म्हटले की, चीनची लष्करी धोरणे केवळ देशाच्या सुरक्षेसाठी आहेत, आणि त्यांचा उद्देश कोणत्याही देशाला धमकावणे किंवा प्रादेशिक अस्थिरता निर्माण करणे नाही.
त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अमेरिका चीनविषयी अधिक सकारात्मक आणि तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारेल आणि दोन्ही देशांच्या सैन्यामधील संबंध खुलेपणा आणि सहकार्यावर आधारित असतील. चीनने अमेरिकेला सुचवले आहे की ती द्विपक्षीय संबंध आणि लष्करी संवाद स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावी. हा वाद चीन-अमेरिका संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण करू शकतो.