चीन-अमेरिकेचे कट्टर शत्रू आता भारताकडून खरेदी करणार 'ब्रह्मोस' मिसाईल! कोणकोणत्या देशांचा समावेश? संपूर्ण यादी समोर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ब्रह्मोस मिसाईलला मागणी जगभरातून वाढली आहे. चीनच्या माध्यमांमध्ये देखील या मिसाईलचे मोठ्या प्रमाणात कौतुक सुरू आहे. चीनच्या साऊथ मॉर्निंग पोस्टने ही अतिशय खतरनाक मिसाईल असल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टींमुळे सुमारे १५ देशांनी ही मिसाईल खरेदी करण्यासाठी रांग लावली आहे. यामध्ये विशेषकरुन चीन आणि अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे हे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होती की, जवळपास १४-१५ देश ‘ब्रह्मोस’ खरेदी करण्यास इच्छुक आहेत. दरम्यान या देशांची नावे देखील समोर आली आहेत. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने न्यू इंडियन एक्स्प्रेसने ही यादी प्रसिद्ध केली आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेच्या अहवालानुसार, या यादीमध्ये थायलँड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, ब्रुनेइ, सौदी अरेबिया, संयुक्त अरब एमिराती, कतार, ओमान, ब्राझील, चिली, अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. यातील फिलिपिन्स देशाने पहिल्यांदा म्हणजेच २०२२ मध्ये ब्रह्मोसची मागणी केली होती.
याअंतर्गत फिलिपिन्स आणि भारतामध्ये ३७५ मिलियन यूएस डॉलर्सचा करार करण्यात आला होता. तसेच व्हिएतनामने देखील ७०० मिलियन यूएस डॉलर्स तर, इंडोनेशियाने ४५० मिलियन यूएस डॉलर्सचा करार भारतासोबत केला आहे.
फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशांचे चीनशी शत्रुत्व आहे. तर दुसरीकडे ब्राझील, व्हेनेझुएला या देशांचे अमेरिकेशी कट्टर शत्रूत्व आहे. अशा वेळी युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास या महासत्ता देशांविरोधात लढण्यासाठी ब्रह्मोस हा त्यांच्यासाठी एकमेव चांगला पर्याय आहे.
भारत आणि रशियाने मिळून तयार केलेले ‘ब्रह्मोस’ हे मिसाईल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले होते. हे मिसाईल आपल्यासोबत तब्बल ३ टन वॉरहेड घेऊन जाऊ शकते. हवा, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही ठिकाणाहून हे मिसाईल लाँच करता येते.
विशेष म्हणजे अगदी कमी उंचीवर देखील हे मिसाईल आरामात उडू शकते. तसेच, हे रडारच्या टप्प्यात देखील येत नाही. याच्या लेटेस्ट व्हर्जनची रेंज ही तब्बल ४५० ते ८०० किलोमीटर एवढी आहे. अवघ्या ३४ कोटी रुपयांमध्ये ही मिसाईल तयार होते. त्यामुळेच या लहान देशांसाठी हा एक खूपच चांगला पर्याय आहे.