फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कैरो: गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामध्ये विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायली सैन्याच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या स्थितीमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी दोन दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, गाझामध्ये ठेवलेल्या चार ओलीसांची सुटका केली जाईल, तसेच काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आणि गाझा पट्टीला मानवतावादी मदत पुरवली जाईल.
दोन दिवसांची युद्धविरामाची मागणी
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी कैरोमध्ये बोलताना सांगितले की, त्यांच्या प्रस्तावाचा काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका तसेच गाझा पट्टीला मानवतावादी मदत पुरवण्याचा उद्देश आहे. दोन दिवसांच्या युद्धबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली की, ती कायमस्वरूपी करण्यासाठी चर्चा सुरू राहील. या प्रस्तावानुसार युद्धविराम झाला तर तो गाझामधील लोकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल. या प्रस्तावात इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारची योजना जाहीरपणे मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इस्रायल किंवा हमासकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही
मात्र, याबाबत इस्रायल किंवा हमासकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इजिप्त, कतार आणि अमेरिका हे हमास आणि इस्रायल यांच्यात प्रमुख मध्यस्थ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या लढाईनंतर आठवडाभर चाललेल्या युद्धविरामानंतर अद्याप कोणताही ठोस युद्धविराम झालेला नाही. दरम्यान, इस्रायलचे मोसाद प्रमुख कतारचे पंतप्रधान आणि सीआयए प्रमुख यांच्याशी चर्चेसाठी रविवारी दोहाला जात आहेत.
इस्त्रायचे गाझावर हल्ले सुरूच आहेत
गाझामध्ये शनिवारी, 27 ऑक्टोबर रोजी इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले. उत्तर गाझामधील 6 इमारतींना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात 45 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे अनेक लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की हमासचा नाश होईपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार आहे.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने हल्ला केल्यापासून इस्रायली लष्कराने गाझावर सतत हल्ले केले आहेत. या युद्धात आतापर्यंत 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझातील सुमारे 75 टक्के पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इजिप्तचा प्रस्ताव गाझामधील लोकांसाठी एक आशेचा किरण ठरू शकतो.
हे देखील वाचा- इस्रायलवर दहशतवादी हल्ला: मोसाद मुख्यालयाजवळ ट्रकने अनेकांना चिरडले; घटनेचा तपास सुरू