फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेत भारतीयांबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला आहे. दरम्यान या भारतीयांविरोधातील वाढत्या द्वेषपूर्ण प्रवृत्ती आणि भारतविरोधी वक्तव्यांवर कॅनडियन संगीतकार ग्रिम्स (क्लेअर बाउचर) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एलॉन मस्क यांच्या माजी सहकारी असलेल्या ग्रिम्स यांनी सोशल मीडियावर भारतीय संस्कृतीचे समर्थन करत, द्वेषाला तोंड देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
ग्रिम्स यांनी म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांमुळे भारतीय संस्कृतीशी त्यांचे जवळचे नाते आहे. त्यांचे वडिल रवि सिद्धू हे भारतीय असून त्या भारतीय कुटूंबात बाढल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “ भारतीय संस्कृतीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवले आहे. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीत सामंजस्य साधणे खूप प्रेरणादायी आहे.”
भारतीयांविरोधातील टिप्पणींवर रोष
ग्रिम्स यांनी सोशल मीडियावर भारतविरोधी वक्तव्यांवर संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या वांशिक हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. श्रीराम कृष्णन यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अमेरिकेत वाद निर्माण झाला होता. या वादावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी “भारतीयांविरोधातील द्वेष पसरवणे हे लज्जास्पद असून, ते नियोजितरीत्या घडत आहे,” असे ठामपणे सांगितले आहे.
भारतीय कौशल्य आणि संस्कृतीचा गौरव
याशिवाय, ग्रिम्स यांनी भारतीय तांत्रिक कौशल्य आणि संस्कृतीचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. अमेरिकन कंपन्यांनी भारतात अधिक गुंतवणूक करावी, यामुळे रोजगार निर्माण होईल आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे त्यांनी सुचवले. “भारतीय आणि अमेरिकन संस्कृतींच्या सामंजस्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक सकारात्मक बदल होऊ शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
भारतीय संगीत आणि चित्रपटाचे कौतुक
तसेच, भारतीय संगीताविषयी आपले प्रेम व्यक्त करताना ग्रिम्स यांनी भारतीय गायकांचे आणि त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. “भारतीय गायक हे जगातील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हेही नमूद केले आहे की, अमेरिकेत बॉलिवूडचा प्रभाव अद्याप मर्यादित आहे आणि त्याला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ग्रिम्स यांची ही प्रतिक्रिया भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित करते. त्यांच्या मतांमुळे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिकांना अधिक पाठिंबा मिळेल आणि द्वेषाला विरोध करण्याची ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा आहे.